मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे लेखणी बंद आंदोलन
By admin | Published: April 7, 2016 01:44 AM2016-04-07T01:44:38+5:302016-04-07T01:44:38+5:30
आपल्या विविध मागण्यांना घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विदर्भ पटवारी संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यात बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले.
विविध मागण्यांचा समावेश : ३० मंडळ अधिकारी व १९० तलाठ्यांचा सहभाग
गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विदर्भ पटवारी संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यात बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून आठही तालुक्यातील ३० मंडळ अधिकारी व १९० तलाठी सहभागी झाले होते.
१० एप्रिल रोजी या लेखणीबंद संदर्भात चर्चा न झाल्यास सदर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. गोंदिया येथील तहसीलदार संजय वामन पवार व उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांची गैरवर्तन व अन्यायकारक व्यवहारामुळे त्यांचे स्थानांतरण करण्यात यावे अशी मागणीही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केली आहे. बनाथर येथील तलाठी पी.बी. निमजे, दासगाव येथील मंडळ अधिकारी यांचे निलंबन मागे घेण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.
सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष एन.एस. लिल्हारे, सचिव बी.डी. भेंडारकर, सहसचिव डी.पी. हत्तीमारे व इतर सदस्यांनी दिली आहे.
अर्जुनी मोरगाव
महाराष्ट्र राज्य तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ आणि विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा गोंदियाने तलाठ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारलेल्या बेमुदत लेखणीबंद आंदोलनाच्या समर्थनार्थ आज (दि.६) पासून तालुक्यातील पटवारी व मंडळ अधिकारी व मंडळ अधिकारी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात तहसीलदार डी.सी. बांबोर्डे यांना निवेदन देण्यात आले.
संघाने निवेदनात तलाठी साझाची व महसूल मंडळाची पुनर्रचना, कार्यालय भाडे देणे, सातबारा संगणीकृत करणे, ई-फेरफारमधील अडचणी दूर करणे, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खणिज वसुलीच्या कामातून यासंवर्गास वगळणे, तलाठी व मंडळ अधिकारी स्वतंत्र कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यातील पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे, खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्तवेतन योजना लागू करणे आणि गोंदियातील निलंबित तलाठी निमजे व म.अ. वरखडे यांचे निलंबन मागे घेणे, या मागण्याना घेऊन तालुक्यातील पटवारी संघाने बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. लेखणीबंद संपामुळे पटवारी कार्यालयात संबंधित कामासाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नागरिकांच्या कार्यालयीन कामाची अडचण लक्षात घेवून संघाच्या मागणीची त्वरित पूर्तता होण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)