मार्च एंडिंगमुळे कार्यालये हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:56+5:302021-03-25T04:27:56+5:30
गोंदिया : वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. मात्र ...
गोंदिया : वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. मात्र मार्च एंडिंगच्या कामांची लगबग व ३१ मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये शासनाच्या ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या निर्णयाला खो घातल्याचे चित्र दिसून येत आहे. असेच चित्र कायम राहिल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण कसे होणार, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच मार्च एंडिंगपूर्वी कामे पूर्ण झालीच पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावत असल्याचे चित्र आहे. कर्मचारी यांची उपस्थिती ५० टक्केच ठेवण्याचे आदेशाचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. यामध्ये विशेष करून महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी, वन, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर परिषदेत ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी दिसून येत आहेत. असे असताना कोरोना संसर्ग कसा नियंत्रित होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग, गोंदिया
शासनाने ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवून नागरिकांची कामेही थांबणार नाहीत यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अध्यादेश काढला आहे. मात्र गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात कामांसाठी आलेले शिक्षक व कर्मचारी फिजिकल अंतराचा फज्जा उडवित असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा परिषदेत कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे.
प्राथमिक शिक्षण विभाग, गोंदिया
जिल्हा परिषद गोंदिया येथे कर्मचारी फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन न करता कामे करताना दिसून आले. जिल्हाभरातील शिक्षक या कार्यालयात विविध कामानिमित्त येतात. त्यात काही लोक तोंडाला मास्क बांधतात तर काही विना मास्कनेच प्रवेश करतात. येथील कर्मचारी काही मास्क बांधतात तर काही लोक मास्क बांधत नाही. काहींनी बांधले तरी ते अधून मधून मास्क काढून इतरांशी गप्पा मारतात.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मुख्य शाखा
गोंदियाच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाळेत कोरोना आहे असे काही चित्रच दिसत नाही. दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोनामुळे शारीरीक अंतर ठेवण्याच्या सूचना जरी देण्यात येत असल्या तरी या बॅंकेत फिजिकल डिस्टंसिग पाळली जात नाही. ग्राहकांची गर्दी नेहमीच दिसून येते. यामुळे कोरोनाचा हॉटस्स्पाॅट गोंदिया तालुका होऊन बसला आहे.
कोरोनाचे संकट असल्याने गोंदियात जातानाही भीती वाटते. मात्र जिल्हा परिषदेत काम असल्याने आलो होतो. मात्र येथे तर अनेकांचे गर्दी पाहून मीच अचंबित झालो. शासन वरिष्ठस्तरावरून अनेक चांगल्या योजना राबविते. मात्र प्रत्यक्ष इथे आलो तर अनेकदा कर्मचारी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र कोरोना नियमाचे आठवण करून देत आदेशाचे पालन होताना दिसत नाही.
-विजय कोरे,तरूण
शिक्षण विभागाच्या कामासाठी माध्यमिक शिक्षण विभागात आलो असता अर्धे कार्यालय खाली होते. परंतु अधीक्षकांच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली. अधीक्षकही सर्वांना घेऊन बसतात. कोरोनाचे नियम पाळा असे काही सांगतांना दिसत नाही. अनेकांना मास्क नसतांनाही कुणीही काही बोलतांना दिसले नाही. त्यामुळे मी आता परत घरी जात आहे.
-आशिष तलमले, नागरिक आमगाव
कामानिमित्त बॅंकेत गेलो असतांना तेथील गर्दी पाहून थक्कच राहिलो. कोरोनाचा हॉटस्पाॅट म्हणून ही बँक गणली जाऊ शकते अशी अफलातून गर्दी यावेळी दिसून आली. ग्राहक दाटीवाटीने तासनतास उभे राहून काम करीत होते. गोरगरिबांचे निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरीब गरजू महिला, म्हातारे लोक बॅंकेत गर्दी करून उभे होते याकडे सर्वाचे दुर्लक्ष होते.
-एस.यू. वंजारी, शिक्षक, गोंदिया.