खाद्यतेलाने महागाई ओतले तेल : ६० रुपयांची झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:30+5:302021-04-02T04:30:30+5:30
गोंदिया : मागील तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले असून, खर्चाचा ताळमेळ ...
गोंदिया : मागील तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले असून, खर्चाचा ताळमेळ बसविताना चांगलीच दमछाक होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आधीच महागाईत वाढ झाली आहे. त्यातच आता खाद्यतेलाने महागाईत तेल ओतल्याने सर्वसामान्य बजेट आउट ऑफ कंट्रोल झाले आहे.
भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. तेल व मिरची मसाले यांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन सणासुदीच्या काळातही तेलाचे दर वाढले होते. दिवाळीनंतर तेलाचे भाव कमी होतील अशी आशा होती. मध्यंतरी ११० रुपये किलोच्या भावाने खाद्यतेल मिळायचे. आता सोयाबीन असो की फल्लीतेल सर्वच खाद्यतेलांचे भाव चांगलेच वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डबल व ट्रीपल फिल्टर खाद्यतेलाला चांगलीच मागणी असते. मात्र विविध कारणांनी खाद्यतेलाच्या भाववाढ सर्वसामान्यांचे टेन्शन वाढले आहे.
आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट ओढावले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंब करीत असले तरी वर्षभरापासूनचे हे रडगाणे संपायचे नाव घेत नाही. आधीच गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरू आहे काय?
..........
मार्चमध्ये वाढ
मागील वर्षभरात खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली मात्र मार्च महिन्यात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. यामुळेच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे.
.....
कशामुळे झाली वाढ
तेल निर्मिती होणाऱ्या साहित्यांमध्ये वाढ झाल्याने ही वाढ झाली आहे. त्यासोबतच कर वाढीचा बोजाही तेलाच्या दरवाढीत दिसून येतो. याचा सरळसरळ फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.
........
ग्रामीण भाग असो की शहरी. तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे. तेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्य किराणा दराच्या साहित्यातही वाढ झाल्याचे दिसून येते. याचा फटका गृहिणींना सहन करावा लागत आहे. मागील दीड वर्षापूर्वी कांद्याने रडू आणले होते. आता तशीच स्थिती खाद्यतेलाबाबत दिसून येत आहे.
- उज्ज्वला नक्षिणे, गृहिणी
..........
सणासुदीच्या काळातही तेलाचे भाव गगनाला भिडले होते. प्रती किलोमागे ५० रुपयांची वाढ गरिबांसाठी मारक ठरणारी आहे. हातावर कमाविणे व पानावर खाणाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे. यावर उपाययोजना करून तेल दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आमचे तर आर्थिक बजेटच बिघडले आहे.
-मनीषा पोटवार, गृहिणी
.........
पाहता पाहता तेलाचे दर चांगलेच वधारले आहे. महिन्याकाठी १५०० रुपयांचे किराणा साहित्य आणायचे. आता २०००च्या वर किराणा साहित्य आणत आहोत. यात सर्वाधिक दरवाढ तेलामुळे झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर तेल खावे की नाही? असा प्रश्न निर्माण होईल. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून तेलाच्या भाववाढीबाबत योग्य निर्णय घेतला पाहिजे.
- मनीषा गोडबोले, गृहिणी
...........
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलांच्या भावात हमखास भाववाढ झाली आहे. याला अनेक कारणे आहेत. सर्वसामान्य नागरिक बहुतांशपणे सोयाबीन तेलाला पसंती देतात. सोयाबीन तेलात प्रति किलो मागे ५५ ते ६० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. १४०० रुपयांना मिळणारे टीन आता २,२५० पर्यंत गेले आहे. दरवाढीचा फटका आम्हालाही बसला आहे. तेलही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्याची किंमत आवाक्यात असली पाहिजे.
- मनोज भांडारकर, किराणा व्यापारी