सावित्रीच्या लेकी खेळल्या हिरीरीने कबड्डी; गोंदिया जिल्ह्यात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:08 PM2018-01-05T16:08:14+5:302018-01-05T16:08:58+5:30
शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हुपराज जमईवार
गोंदिया: शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. दरवर्षी येथे ही जयंती क्रीडा स्पर्धा घेऊन साजरी केली जाते. यात प्रौढ वयोगटातील स्त्रिया कबड्डीच्या सामन्यात सहभागी होतात. यंदाची जवळपासच्या ११ गावांमधील स्त्रियांनी आपले क्रीडाकौशल्य यात आजमावले.
अंजी गावच्या खेलन पटले या ५५ वर्षांच्या महिलेने, आपण दरवर्षी कबड्डी खेळत असल्याचे सांगितले. लहानपणापासूनच या खेळाची आपल्याला आवड होती. होळीच्या रात्रीही आपण सर्व महिलांसोबत कबड्डी खेळतो असे त्या म्हणाल्या. या खेळाकडे नवीन पिढी दुर्लक्ष करीत आहे आणि त्यामुळे या खेळाचे महत्त्व कमी होत चालले असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सामन्यात जवळपासच्या सुमारे ४०-५० महिला सहभागी झाल्या होत्या.