जुना जीर्ण उड्डाणपूल लवकरच पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:19 PM2019-07-11T22:19:01+5:302019-07-11T22:19:30+5:30
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना र्जीण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम नागपूर येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना र्जीण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम नागपूर येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीकडून उड्डाणपूल पाडण्यासंबंधि नियोजनात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरूवात केली जाणार आहे.
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच जीर्ण उड्डाणपुलाची स्थिती लक्षात घेत या पुलावरुन जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर लोकमतने जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा मुद्दा लावून धरला. तसेच या पुलावरुन दुचाकी वगळता इतर सर्व वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या पुलावरुन केवळ दुचाकी आणि तिन चाकी वाहनांना प्रवेश सुरू ठेवला होता. पण जीर्ण उड्डाणपूल पाडण्याची रेल्वे दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने कुठलीच पावले उचलली नव्हती.
जीर्ण उड्डाणपुलाचा धोका कायम होता. त्यानंतर हा मुद्दा आ.गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत लावून धरुन जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधकासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करुन घेतला.पंधरा दिवसांपूर्वीच नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला पात्र झाले आहे.त्यामुळे नवीन उड्डाणपूल बांधकामाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी येणार १ कोटीचा खर्च
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी तसेच नवीन पुलाच्या बांधकामाचा नकाशा आणि इतर कामाचे नियोजन करण्यासाठी शासनाने २ कोटी ५० लाख रुपयांचा वेगळा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करुन दिला आहे.जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम किचकट आणि जोखमीचे असल्याने नागपूर येथील एका अनुभवी एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. ही एजन्सी उड्डाणपूल पाडण्यासंबंधिचे नियोजन तयार करुन सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार आहे. त्यानंतरच जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी जवळपास १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याची माहिती आहे.
रेल्वे विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका
जुना जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅकच्या परिसरात येतो. त्यामुळे हा पूल पाडताना रेल्वेला या मार्गावर मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. तसेच पूल पाडताना तांत्रिकदृष्टया रेल्वे विभागाची सुध्दा मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत रेल्वे विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.
वर्षभरात पूल तयार करण्याचे नियोजन
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल हा शहराच्या दोन्ही भागाला जोडणारा महत्त्वपूर्ण पूल आहे. त्यामुळे हा पूल पाडून नवीन पूल तयार करण्यास बराच कालावधी लागल्यास शहरवासीयांची अडचण होवू शकते. त्यामुळे वर्षभरात नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी शासनाने ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला पात्र झाले आहे.जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम एका एजन्सीला दिले असून लवकरच हा पूल पाडण्याचा कामाला सुरूवात केली जाईल.
-मिथीलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.