जुना उड्डाण पूल वाहतुकीस डेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:04 PM2018-07-23T22:04:25+5:302018-07-23T22:05:31+5:30

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीस धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन पूल त्वरीत पाडण्यात यावा. यासंबंधीचे पत्र दोन दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानंतर जुना उड्डाण पूल येत्या आठ दिवसात वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे.

Old Flight Pool Transportation Danger | जुना उड्डाण पूल वाहतुकीस डेंजर

जुना उड्डाण पूल वाहतुकीस डेंजर

Next
ठळक मुद्देआठ दिवसात वाहतूक होणार बंद : नवीन उड्डाण पूल सदोष

अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीस धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन पूल त्वरीत पाडण्यात यावा. यासंबंधीचे पत्र दोन दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानंतर जुना उड्डाण पूल येत्या आठ दिवसात वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे.
गोंदिया बालाघाट मार्गावर १९५२ मध्ये उड्डाणपूल तयार करण्यात आला. या पुलामुळे रेल्वे ट्रॅकमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळ ६६ वर्षे याच उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु होती. याच उड्डाणपुलावरुन तिरोडा, बालघाट मार्गे येणारी लहान मोठी सर्वच वाहने येतात. पलिकडच्या भागात जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो. दिवसभरात या पुलावरुन दोन ते तीन हजार वाहने धावतात.या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तर रेल्वे ट्रॅकच्या वरून जाणाऱ्या उड्डाण पुलाला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. हा भाग रेल्वे विभागाच्या क्षेत्रात असल्याने रेल्वेने या उड्डाण पुलाचे स्ट्रक्चर आॅडिट केले. त्यात ट्रॅकवरुन गेलेला उड्डाण पूल वाहतूक करण्यायोग्य नसून तो केव्हाही कोसळू शकतो. ही बाब आॅडिटनंतर पुढे आली. त्यामुळे रेल्वे विभागाने २१ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देवून जुन्या उड्डाणपुलावरुन सुरु असलेली वाहतूक त्वरीत बंद करावी. यादरम्यान कुठली अनुचित घटना घडल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही. संभाव्य धोका लक्षात घेता हा उड्डाण पूल त्वरीत पाडण्यात यावा. जुन्या उड्डाण पुलावरुन सुरू असलेली वाहतूक पूर्णपणे बंद करावी असे पत्रात म्हटल्याची माहिती आहे. रेल्वे विभागाचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हातात पडताच त्यांनी झपाट्याने सूत्रे हालविली. रविवारी (दि.२२) सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांशी बैठक घेवून या विषयावर सविस्तर चर्चा केली.
जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक आठ दिवसात पूर्णपणे बंद केल्यास त्याला पर्यायी व्यवस्था काय आहे. वाहतूक कोंडी कशी सोडावायची या संबंधिची चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून येत्या आठ दिवसात जुना उड्डाण पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होईल.
तीन विभागाने केली पुलाची पाहणी
रेल्वेने जुना उड्डाण पूल जीर्ण झाल्याचे व तो वाहतुकीस योग्य नसल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांची टिम तयार करुन जुन्या आणि नवीन उड्डाण पुलाची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या तिन्ही विभागाच्या अधिकाºयांनी जुन्या उड्डाण पुलाची पाहणी केली. त्यात हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून त्यावरुन वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सोमवारी (दि.२३) सोपविल्याची माहिती आहे.
जुना जीर्ण तर नवीन सदोष
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण झाला आहे. तर दोन वर्षांपूर्वी याच मार्गावर तयार करण्यात आलेला नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम सदोष आहे. या उड्डाण पुलाचा उतार अधिक असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन उड्डाण पुलावरुन जड वाहतूक सुरू ठेवणे अंत्यत धोकादायक असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक नियंत्रण विभागाने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या पुलावरुन सुध्दा जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जुना जीर्ण तर नवीन उड्डाण पूल सदोष असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
बुधवारी निघणार अधिसूचना
रेल्वे विभागाने जुना उड्डाण पूल जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद तर नवीन उड्डाण पुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधिची अधिसूचना जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी (दि.२५) काढण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
रेल्वे ट्रॅक परिसरातील पुलाला पडले भगदाड
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाण पुलाच्या बांधकामाला आता ५६ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला आहे. या पुलाच्या रेल्वे ट्रॅक परिसरातील भागाला मोठे मोठे भगदाड पडले आहे. पुलाच्या खालची बाजू सुध्दा जीर्ण झाली असल्याने केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठीच रेल्वे विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून जुन्या पुलावरुन सुरू असलेली वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती आहे.
मुंबईच्या घटनेची धास्ती
काही दिवसांपूर्वी मुंबई येथे रेल्वेचा एक जुना उड्डाण पूल कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक परिसरात येणाºया सर्व उड्डाण पुलाची माहिती घेवून जे उड्डाण पूल जीर्ण झाले आहे. ते पाडण्याची व त्यावर उपाय योजना सुरू करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याच अंतर्गत गोंदिया येथील जुना उड्डाण पूल पाडण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहे.
बायपास मार्गे वळविणार वाहतूक
येत्या आठ दिवसात शहरातील जुना उड्डाण पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाण पुलावरील जडवाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. त्यामुळे गोंदिया-बालाघाट, तिरोडा मार्गावरील जडवाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी होवू नये यासाठी संपूर्ण जडवाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बायपास मार्गे वळविली जाणार आहे. त्यामुळे एसटी बस, स्कूल बससह इतर वाहनाना जयस्तंभ चौकात येण्यासाठी बायपास मार्गेच शहरात यावे लागणार आहे.
नवीन पुलाचा प्रस्ताव पाठविणार
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण तर नवीन उड्डाण पूल वाहतुकीसाठी सदोष आहे. त्यामुळे या पुलावरुन वाहतूक सुरु ठेवण्याचा धोका पत्थकारण्यास प्रशासन तयार नाही. मात्र पुलावरील वाहतूक बंद केल्यास वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ती होवू नये यासाठी गोंदिया-बालाघाट मार्गावर नवीन उड्डाण पूल तयार करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागातर्फे तयार करुन शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
२०१४ मध्येच रेल्वे दिला होता इशारा
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल वाहतुकीसाठी धोकादायक असून या उड्डाण पुलावरुन वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा इशारा रेल्वे विभागान २०१४ मध्ये जिल्हा प्रशासनाला पत्र देवून दिला होता. मात्र तत्कालीन अधिकाºयांनी याची गांर्भियाने दखल घेतली नव्हती. पण, मुंबई येथे घडलेल्या घटनेनंतर रेल्वे विभाग कोणताही धोका पत्थकारण्यास तयार नाही. त्यामुळेच तातडीने पत्र देवून जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णबंद करण्यास सांगितले आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण झाला आहे. तर रेल्वे ट्रॅक परिसरातील उड्डाण पुलाची अवस्था बिकट आहे. जुन्या उड्डाण पुलाचा इतर भाग चांगला आहे. मात्र रेल्वे ट्रॅक परिसरातील पुलाची स्थिती गंभीर असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले आहे. त्यामुळेच या उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची कारवाही सुरू आहे. तसेच यावर पर्याय शोधला जात आहे.
- सोनाली चव्हाण,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.

Web Title: Old Flight Pool Transportation Danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.