स्ट्रक्चर आॅडिटमध्ये जुना उड्डाणपूल फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:29 AM2018-10-13T00:29:59+5:302018-10-13T00:30:49+5:30
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.
या पुलावरुन केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवता येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे विभागाने तीन महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र देवून शहरातील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी आणि पुलाच्या दोन्ही बाजुच्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेवून या पुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद केली होती.
जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर आॅडिट करुन याचा अहवाल आल्यानंतर पुलावरुन वाहतूक सुरू ठेवायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचे ठरविले होते.
सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वे विभागाच्या तज्ञांकडून या पुलाचे स्ट्रक्चर आॅडिट केले. यात हा पूल वाहतुकीसाठी योग्य नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरापूर्वीच उंची कठड्यानंतर पुलावर रुंदी कठडे लावले. तसेच दुचाकी व तीन चाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निणर्याचे सर्रासपणे उल्लघंन केले जात आहे.
वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष
जुन्या उड्डाणपुलावरुन केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश असताना या पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. त्यामुळे पुलावर अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला वाहतूक नियंत्रण विभागाचे शिपाई कर्तव्यावर असतात मात्र त्यांच्याच डोेळ्यादेखत जुन्या पुलावरुन चार चाकी वाहने धावत आहेत.
रेल्वे पाडणार पूल
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल रेल्वे विभाग पाडणार आहे. मात्र उड्डाणपूल पाडण्यासाठी येणार खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा लागणार आहे. रेल्वे विभागाने सहा महिन्यात उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे.
६४ कोटी रुपयांच्या नवीन पुलाचा प्रस्ताव
शहरातील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन उड्डाणपूल बांधकामाचा ६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव व आराखडा शासनाकडे पाठविला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.