घरी पत्नीची तिरडी बांधत होते अन् पती मतदानासाठी रांगेत उभा होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 01:12 PM2022-05-27T13:12:05+5:302022-05-27T13:20:32+5:30
पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. त्यांनी गावापासून १० किमी दूर असलेल्या बूथवर जाऊन आणि काही वेळ रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
विजय मानकर
सालेकसा (गोंदिया) : निवडणूक हा देशातील सर्वांत मोठा सण असल्याचे म्हटले जाते. पण, लोक कोणत्याही सण किंवा उत्सवात तेव्हाच सहभागी होतात जेव्हा त्यांच्या जीवनात आनंद असतो. पण, इथलं प्रकरण जाणून तुम्हीही भावुक व्हाल. ‘सगळं काम सोडा, आधी मतदान करा!’ अशा घोषणा तुम्ही खूप ऐकल्या असतील. पण, घोन्सी येथील एका वृद्धाने असाच एक आदर्श घालून दिला. देशाप्रति असलेले कर्तव्य पार पाडण्याचा संदेश त्यांनी दिला.
भैयालाल तुलाराम बिसेन (८०) आणि त्यांचा मोठा भाऊ सूरजलाल बिसेन (९४) सालेकसा तालुक्यातील घोन्सी येथे राहणाऱ्या या भावंडांचे सहकारी भात गिरणी निवडणुकीदरम्यान एक उदाहरण पुढे आले आहे. सालेकसा सहकारी भात गिरणीचे २४ मे रोजी मतदान होते. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २३ मे रोजी भैयालाल बिसेन यांच्या पत्नी गणेशबाई बिसेन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
२४ मे रोजी पत्नीवर अंत्यसंस्कार होणार होते. परिवार शोकसागरात बुडाला होता. तर दुसरीकडे याच दिवशी निवडणूक होती. लोकांना वाटत होते की कदाचित भैयालाल बिसेन आणि त्यांचे मोठे बंधू सूरजलाल बिसेन मतदानाला जाणार नाहीत. पण, तसे झाले नाही. भैयालाल बिसेन यांच्या डोळ्यांत अश्रू होते. पत्नीचा मृतदेह घरात ठेवण्यात आला होता. पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. त्यांनी गावापासून १० किमी दूर असलेल्या जि. प. शाळेतील सालेकसा येथील बूथवर जाऊन आणि काही वेळ रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
भैयालाल बिसेन परतल्यानंतरच त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भैयालाल बिसेन आणि त्यांचे मोठे बंधू जेव्हा मतदान करत होते, तेव्हाही त्यांच्या डोळ्यात ओलावा होता. भैयालाल बिसेन यांच्या पत्नीच्या निधनाची माहिती तेथे उपस्थित लोकांना समजताच त्यांना धक्का बसला. या ज्येष्ठांच्या देशाप्रति असलेल्या समर्पण भावनेने भावी पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.