मनरेगाच्या मजुरांना जुन्याच कामांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:43 PM2019-03-16T21:43:31+5:302019-03-16T21:44:10+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुन्याच आर्थिक वर्षांतील कामांचा मजुरांना आधार होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुन्याच आर्थिक वर्षांतील कामांचा मजुरांना आधार होत आहे. ज्या कालावधीत मजुरांना कामांची आवश्यकता असते त्याच कालावधीत कामे सुरु होणार नसल्याने कामाच्या शोधात भटकंती करण्याची वेळ मजुरांवर येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तिरोडा तालुक्यात सद्यस्थितीत ११७ कामांवर १६०० मजूर कार्यरत आहेत. तालुक्यात सध्या सुरू असलेली सर्व कामे ही मागील वर्षांतील असून नवीन कामांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ही कामे संपल्यानंतर मजुरांना पुन्हा कामाच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे. तलाव खोलीकरणाची चार कामे सुरू १६ मजूर कार्यरत आहेत. नाला सरळीकरणाची दोन कामे सुरू असून ६०५ मजूर कार्यरत आहे. कालवा दुरुस्ती दोन कामे सुरू असून ५०० मजूर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे २१ कामे सुरू असून ९७ मजूर कार्यरत आहे. तर घरकुल योजनेच्या ७१ कामावर २५२ आणि गुरांचे गोठे तयार करण्याच्या कामावर १६ मजूर १०१ असे एकूण ११७ कामावर १५५१ मजूर कार्यरत आहे.
ही सर्व कामे मागील आर्थिक वर्षातील असून २०१९ मधील नवीन कामांना निवडणूक आचारसंहितेमुळे मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. नाला सरळीकरण व कालवा दुरुस्तीचे कामे मागील १५ दिवसांपासून सुरु आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यानंतर शेतीची कामे पूर्णपणे आटोपलेली असतात. त्यामुळे शेतकरी व शेत मजुरांच्या हाताला काम नसते. त्यामुळे या कालावधीत मनरेगाच्या कामांची मजुरांना मोठी मदत होत असते. मात्र यंदा निवडणूक आचार संहितेमुळे ही कामे किमान दोन महिने सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मजुरांना कामाच्या शोधात भटकंतीे करावी लागणार आहे.
मोजमाप चुकीचे
आठवड्यात संपूर्ण कामाचा मोजमाप करुन तशी रोजंदारी ठरविण्याचे अधिकार संबंधित कनिष्ठ अभियंत्याला आहेत. याचाच फायदा हे अधिकारी घेत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, मजुरांकडून काही पैसे सुद्धा घेतले जात असल्याची माहिती आहे. काही कामात कनिष्ठ अभियंता मोजमाप झालेल्या जागेचा पुन्हा मोजमाप रोजी वाढविण्याकरिता करतात. त्यामुळे यासर्व प्रकारांची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.