वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन मिळतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:38+5:302021-02-11T04:31:38+5:30
बाराभाटी : गावागावात कलावंताचा जन्म होतो, आपली कला सादर करून जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह करतात, पन्नास वर्ष वय झाले की ...
बाराभाटी : गावागावात कलावंताचा जन्म होतो, आपली कला सादर करून जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह करतात, पन्नास वर्ष वय झाले की शासनाकडून वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना प्रत्येक साहित्य व कलाक्षेत्रातील लोकांना मिळते; पण गेल्या काही महिन्यांपासून समाज कल्याण जिल्हा परिषदेमधून वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन मिळतच नाही, अशी वृद्ध कलाकार व साहित्यिकांची मागणी आहे. आपली माती म्हणजे हौसी कलाकार जन्मास घालणे व एक मोठे नाव उज्ज्वल करणे फार महत्त्वाचे आहे, परिसरासह झाडीपट्टीचा भाग म्हणजे पूृर्व विदर्भातील गोदिंया जिल्हा. जिल्ह्यात नाटक, तमाशा, गोंधळ, भजन डहाका, कीर्तन, दंडार आदींचे कलाकार व सहभागी वादक मंडळी फार साहित्याची व कलेची रंगभूमीवर सेवा करतात.
पन्नास वर्ष पूर्ण झाले की, अशा कलाकारांना शासन दरबारी वृद्ध कलावंत मानधन योजनेंतर्गत मानधन सेवा योजना लागू होतेे; पण गोदिंया जिल्ह्यात ही योजना काही महिन्यांपासून ठप्प आहे. जिल्ह्यात जवळपास एक वर्षांपासून वृद्ध, साहित्यिक व कलावंत समितीच गठित करण्यात आली नाही. ही समिती जिल्हा पालकमंत्री याच्या अध्यक्षतेखालील तयार केली जाते.
अनेक कलाकार मंडळी मानधनापासून वंचित आहे. काहींचे प्रस्ताव सादर केले त्यांना अजूनही योजना लागू झाली नाही. मागील समितीकडून कलावंताचे प्रस्ताव उत्तमरीत्या शासनाकडे सादर झाले नाही, अनेकांना याचा लाभ झाला नाही, अनेक कलाकार व साहित्य क्षेत्रातील नागरिक अनेक अडचणीमुळे वंचित राहिले. तालुकास्तरावरच प्रस्ताव पडून राहतात, तर कधी पोहोचवले जात नाही आणि अशा कारनाम्यांची वेदना कलाकारांना सोसावी लागते म्हणून प्रस्तावाना मंजुरी मिळतच नाही.
कोरोनाच्या संकटामुळे शहराच्या कलाकाराप्रमाणेच ग्रामीण भागातील कलावंत उपेक्षितच आहेत, कोरोना वाढू नये म्हणून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत, अशातच कलावंतावर उपासमारीची वेळ आहे, म्हणून ही तरी समिती गठित करून वृद्ध कलावंताना मानधन लागू करून चेहरा फुलवावा, असी मागणी सर्व कलाकार करीत आहेत.
............
प्रस्ताव सादर करून वृद्ध कलावंतांना अद्यापही मानधन मिळालेले नाही. यासाठी अनेकदा समाजकल्याण कार्यालय आणि लोकप्रतिनिधींच्या घरच्या पायऱ्या झिजविल्या; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
- दादाजी रुका मेश्राम, दंडार, ढोलक कलावंत, बाराभाटी.
------------------
तीन वर्षांपासून माझा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे सादर केला आहे. पण अजूनही मानधनाचा लाभ मिळाला नाही. अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे यासाठी पाठपुरावा कोणाकडे करावा हेच समजण्यापलीकडे आहे.
- संजय ठवरे, नाट्यलेखक, अरततोंडी
--------------------
वृद्ध कलावंताचे सर्व प्रस्ताव तातडीने पास करून उपेक्षित कलाकारांची उपासमारी दूर करावी. कोरोनामुळे सर्वाधिक फटका झाडीपट्टीतील कलावंतांना बसला. पण शासनाकडून कुठलीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाने आता तरी दखल घ्यावी.
- ज्ञानेश्वरी कापगते, नाट्य कलावंत, वडसा