दिवाळीला गरिबांच्या झोपडीमध्ये एक पणती लावण्याचेही झाले वांधे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:27 PM2024-10-25T17:27:42+5:302024-10-25T17:29:46+5:30
खाद्य तेलाच्या भाववाढीचा परिणाम : सर्वसामान्यांना महागाईच्या झळा
प्रफुल्ल लुंगे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : दिवाळीचा सण तोंडावर आला असून एकाएकी तेलाचे भाव खूप वाढले आहे. सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलोवर पोहोचले आहे. सर्वसामान्य माणूस सोयाबीनचे तेल खातात. पण, सोयाबीनच्या तेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीला गरिबाच्या झोपडीत एक तरी पणती लागणार का? अशी अवस्था झाली आहे.
दिवाळी म्हणजे तेजोमयी सण असल्याने घरोघरी पणत्यांची रांग लागते. मोठ्या प्रमाणात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. एकाएकी दिवाळीच्या तोंडावर तेलाचे भाव वाढल्याने दिवाळीचे नियोजन कोडमडले आहे. गोरगरिबांच्या झोपडीपुढे आता एक दोनच पणत्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य गोरगरीबही दिवाळीचा सण उत्साहात साजरे करतात. त्यांचेही एक छोटे-मोठे बजेट तयार असते. त्या बजेटमध्येच गरीब माणूस आपली दिवाळी साजरी करतो. अन्नधान्य, किराणा यांचे भाव वाढले की त्याचे बजेट ढासळते. दिवाळीच्या दिवसात शेव, चकली, अनारसे, चिवडा असे पदार्थ गोडधोडासोबत करावे लागतात. मात्र तेलाचे भाव वाढल्याने या फराळाच्या पदार्थावरही कात्री लागणार आहे. यंदाची दिवाळी आटोक्यात साजरी होणार आहेत.
दिवाळीत करावी लागतेय काटकसर
अनेक बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये प्राप्त झाले. काही बहिणींच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. ज्यांना पैसे मिळाले त्या बहिणींनी स्वतः साठी साडी व नवीन कपडे न घेता मुलाबाळांसाठी कपडे खरेदीचे नियोजन केले आहे. काही बहिणींनी आपल्या घरधन्यासाठी काटकसर करून नवीन कपडे खरेदी केले आहे. नाममात्र पेंशात यंदाची दिवाळी गोरगरिबांच्या घरी साजरी होणार असून त्यांना वाढलेल्या तेलाच्या भावाचा व इतरही महागाईचा फटका गरिबांना बसला आहे. तरीही दिवाळीचा सण कुटुंबासह आनंदात आपापल्या परीने साजरा करण्याचा बेत सर्वांनी आखला आहे