Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील शंभर नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:18 PM2020-04-09T20:18:22+5:302020-04-09T20:19:33+5:30
जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.तर गुरूवारी पुन्हा १५ स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. जिल्ह्यातील आतापर्यत शंभर स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील ६४ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. तर गुरूवारी ४४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आधी पाठविलेले ५ आणि गुरूवारी (दि.९) पाठविलेले १५ अशा एकूण २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त होणे बाकी आहे. तर एक नमुना आधीच पाझिटिव्ह आला आहे.दरम्यान आत्तापर्यंत पाठविलेले शंभर नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना सुध्दा मोठा दिलासा मिळाला आहे.
८६ जण शासकीय अलगीकरण केंद्रात
दिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दिल्ली प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना शासकीय अलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना शासकीय अलीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील यात दोन शासकीय अलगीकरण कक्षात आत्तापर्यंत ८६ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ७६ आणि लहीटोला १० अशा एकूण ८६ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ.संगिता पाटील यांनी सांगितले.
अलगीकरणाचा कालावधी संपलेल्यांवर नजर
जिल्ह्यात २५१ व्यक्ती विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आल्यात.त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. अलगीकरणाचा कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगिकरणातच राहावे.आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच त्यांच्यावर आरोग्य विभागाची सुध्दा नजर आहे