वाहन अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:07 AM2017-07-20T00:07:38+5:302017-07-20T00:07:38+5:30
शहरातील राज्य मार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालक
तीन गंभीर : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शहरातील राज्य मार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालक व पायी मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी मृत्यूला आमंत्रण देत आहेत. आमगाव शहरातील याच राज्य मार्गावर बुधवारच्या पहाटे किरणापूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले.
आमगाव शहरातील मुख्य राज्य मार्गावर नियोजन अभावी रस्ते खड्यांमध्ये रुपांतरीत झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील मार्गक्रम धोक्याचे ठरले आहे. १८ जुलैला मध्यरात्री किरणापूर येथील कावरे कुटुंबिय रायपूरकडे टाटा इनोव्हा क्र.सीजी ०४ डीए ०३०९ या वाहनाने रायपूरकडे जाताना आमगाव व येथील मानकर गुरुजी चौकात खड्यांमधून वाहन मार्गक्रम करताना वाहन असंतुलीत झाले. परिणामी हे वाहन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या रस्ता दुभाजकाला धडकले. यात वाहनाचे समोरील भागाचा चंदामेंदा झाला.
या अपघातात वाहनातील भोजराज नुतनलाल कावरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील कृष्णा शोभेलाल कावरे (१९), आशिष शोभेलाल कावरे (२०), वासूदेव शोभेलाल कावरे (१७) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पोलीस विभागाने अपघातातील वाहन चालक संजू राजकुमार शाहू (४०) रा. रायपूर (छ.ग.) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव येथील मुख्य मार्गावर पडलेल्या रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताची होत असलेली घटना यात सार्वजनिक बांधकाम विभागाला घटनेच्या दोषारोपात घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.