एक लाख विद्यार्थी घेणार ‘वाचन आनंद’
By admin | Published: December 31, 2015 01:49 AM2015-12-31T01:49:52+5:302015-12-31T01:49:52+5:30
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात.
नरेश रहिले गोंदिया
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना एक दिवस दप्तरापासून मुक्ती देवूनही त्यांना ज्ञानार्जन करता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत ३१ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना वाचन आनंद देण्यासाठी दप्तर विरहित दिन साजरा करण्याचा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार गोंदिया जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थी ३१ डिसेंबर रोजी शाळेत दप्तर घेऊन जाणार नाहीत तर आपल्या शाळेतील ग्रंथालय व वाचनालयातील पुस्तक त्या दिवशी वाचणार आहेत.
दप्तरविरहीत दिन साजरा करण्यासाठी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके प्रदर्शनात आणून ठेवले जाणार आहेत. घरची मासिके, जूनी पुस्तके, गावातील ग्रंथप्रेमी लोकांजवळील उपयुक्त पुस्तके विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी या संबंधीत सूचना गटशिक्षणाधिकाच्या माध्यमातून संबंधीत मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. या दिवसी वाचन स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील ११०० शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडून आदर्श वाचन घेण्यासाठी विद्यार्थी मला आवडलेली पुस्तक, माझा आवडता लेखक, आवडलेल्या पुस्तकाचे परिचय इत्यादी उपक्रम प्रत्येक शाळास्तरावर आयोजित करण्यासंबंधी सूचना गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहे. शालेय ग्रंथालयातील विद्यार्थ्यांनी वापरलेल्या पुस्तकांची नोंद वाटप रजिस्टरमध्ये घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने २३ डिसेंबर रोजी घेतलला ठराव एक दिवस दप्तर मुक्ती अन् आनंदाचा अभ्यास म्हणून वर्षाचा अखेरचा दिवस म्हणून निवडला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा यात सहभागी झाल्या असून गोंदिया जिल्ह्यातील ९९ हजार ९८५ विद्यार्थी वाचन आनंद दप्तर विरहित दिन साजरा करणार आहेत. शिक्षणाधिकाऱ्याच्या पुढाकाराने बालमनावर संस्कार करणे सुरू आहे.