पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत एक जण बुडाला, निमगाव येथील घटना
By अंकुश गुंडावार | Published: June 18, 2024 09:17 PM2024-06-18T21:17:21+5:302024-06-18T21:17:39+5:30
बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु
अर्जुनी मोरगाव : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पडलेली मोटार बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेला एक व्यक्ती विहिरीत बुडाल्याची घटना मंगळवारी (दि.१८) दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील निमगाव येथे घडली. माधो सोविंदा मेश्राम (५०) रा. बोंडगावदेवी असे विहिरीत बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुडालेल्या व्यक्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अग्निश्मन दलाला पाचारण करुन विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील तलावात पाणी पुरवठा योजेनेच्या विहिरीचे बांधकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना मंगळवारी विहिरीतील पाण्यात मोटार पडली. विहिरीत जवळपास २५ फूट पाणी असल्याने कंत्राटदाराने या कामात पारंगत असलेल्या बोंडगावदेवी येथील माधो मेश्राम या व्यक्तीला मोटार काढण्यासाठी बोलाविले. माधो मेश्राम आणि त्याचा सोबती दागो मानकर हे मंगळवारी दुपारी निमगाव येथे पोहचले. यानंतर दोघेही घटनास्थळी पोहचल्यानंतर माधो मेश्राम हा विहिरीत मोटार काढण्यासाठी उतरला तर त्याच्यासोबत असलेला दागो मानकर हा विहिरीच्या बाहेर होता.
दरम्यान माधोला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत बुडाला. दरम्यान दागो मानकर याने या घटनेची माहिती कंत्राटदार विहिरीचे काम करीत असलेल्या मजुरांना दिली. सर्वांनी विहिरीकडे धाव घेत माधोला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण विहिरीत जवळपास २५ फूट पाणी असल्याने माधोला विहिरीतून बाहेर काढण्याची अडचण निर्माण झाली. दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करुन विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले. वृत्तलिहेपर्यंत विहिरीतून पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरुच होते.
माधो होता या कामात पारंगत
बोंडगावदेवी येथील माधो मेश्राम हा व्यक्ती विहिरीत उतरण्यासाठी व तसेच विहिरीत पडलेल्या मोटार बाहेर काढण्याच्या कामात अत्यंत पारांगत होता. त्यामुळे तालुक्यात असे कुठलेही काम असल्यास त्याला बोलविले जात आहे. पण मंगळवारी तो पारंगत असलेल्या कामानेच त्याचा घात केला. या घटनेमुळे माधो मेश्राम याच्या कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे.