जिल्ह्यात ५८० लोकांमागे एक पोलिस ! कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना कसरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:39 IST2025-01-22T15:38:01+5:302025-01-22T15:39:12+5:30
Gondia : १३ लाख २२ हजार लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे

One policeman for every 580 people in the district! A struggle to maintain law and order
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे; परंतु ती अबाधित ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच पोलिस दलाकडे नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांची संख्या तेवढीच आहे. सद्यःस्थितीत गोंदिया पोलिस विभागात सुमारे दोन हजार मनुष्यबळ आहे. त्यांच्यावरच १३ लाख २२ हजार लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे सरासरी ५८० लोकांमागे एक पोलिस कर्मचारी असल्याचे दिसते. मनुष्यबळ कमी असल्यास कसे होईल रक्षण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा नक्षलग्रस्त व अत्यंत संवेदनशील असल्याने नक्षल बंदोबस्तासोबतच इतर बंदोबस्त, विविध गुन्ह्यांचा तपास यामुळे पोलिस कर्मचारी तणावात राहतात. त्यातून पोलिस कर्मचारी आत्महत्येचे पाऊल उचलतात. एकीकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी मात्र मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
२०११ च्या जनगणनेनुसारच पोलिस बळ देण्यात आलेले होते; परंतु त्यानंतर आता लोकसंख्येत झपाट्याने वाढ होऊन १३ लाख २२ हजारांच्या घरात पोहोचली; परंतु तरीही मनुष्यबळ वाढलेले नाही. त्यामुळे एका पोलिसावर सरासरी ५८० लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आली आहे. हा आकडा पाहता सामान्यांची सुरक्षा कशी होईल ? असा प्रश्न आहे. त्यामुळे गोंदिया नव्हे, तर राज्यात पोलिस मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शासन स्तरावरून केवळ गोंदियाच नव्हे, तर राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्येनुसार मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर निघत आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी सुध्दा लक्ष वेधण्याची गरज आहे.
सण, उत्सवातही कुटुंबासोबत नाही
ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता आणि कोणताही सण, उत्सव असला, तरी पोलिस बांधव, भगिनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून बंदोबस्त करतात. अनेकदा बाहेर राज्यातही प्रवास करावा लागतो. त्यातच निवडणूक, इतर बंदोबस्त काळात सुट्टीही भेटत नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी-कर्मचारी तणावात असतात.
राजा बदलतो, सेना तीच
जिल्ह्यातील १३.२२ लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे; परंतु कशाचीही तमा न बाळगता पोलिस बांधव २४ तास जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असतात. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बदलत असतात, परंतु कर्मचारी तेच असतात. जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कामाची पद्धत वेगवेगळी असते.
अशी आहे पोलिसांची आकडेवारी
पदे मंजूर कार्यरत
पोलिस अधीक्षक ०१ ०१
अपर पोलिस अधीक्षक ०१ ०१
उपविभागीय पोलिस अधी. ०६ ०४
पोलिस निरीक्षक २२ २१
एपीआय ४८ ३९
पीएसआय ७० ६२
कर्मचारी २३०६ २२८३
जिल्ह्याची लोकसंख्या १३२२ ५०७
पोलिस ठाणे १६ तालुके ८