‘कॅशलेस’साठी महावितरणचे एक पाऊल पुढे
By admin | Published: January 21, 2017 12:15 AM2017-01-21T00:15:23+5:302017-01-21T00:15:23+5:30
व्यवहारांत पारदर्शकता यावी या दृष्टीने शासनाने ‘कॅशलेस’ व्यवहारांवर आता जोर देत अवघ्या देशभर हा फंडा सुरू केला आहे.
मोबाईल अॅपमध्ये सुधारणा : एका क्लिकवर मिळताहेत सर्व सुविधा
गोंदिया : व्यवहारांत पारदर्शकता यावी या दृष्टीने शासनाने ‘कॅशलेस’ व्यवहारांवर आता जोर देत अवघ्या देशभर हा फंडा सुरू केला आहे. याला देशातून प्रतिसाद मिळत असतानाच महावितरणनेही यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणने आणलेले मोबाईल अॅप आता एक सवय होत चालले असून एका क्लिकवर वीज ग्राहकांना यातून सर्व सुविधा मिळत आहेत.
आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास रोख व्यवहारांमध्ये पारदर्शकता नव्हती. परिणामी कित्येकांकडून कर चोरी केली जात होती व त्याचा फटका शासनासह देशवासीयांना बसत होता. यावर आळा बसावा व सर्व व्यवहारांत पारदर्शिता यावी या दृष्टीने शासनाने आता ‘कॅशलेस’ ही नवीन पद्धत अंमलात आणली आहे. यांतर्गत होणारे सर्व व्यवहार आता नजरेत येणार असल्याने शासनासह जनतेचाही यात फायदा होणार आहे. परिणामी सर्वच विभागांकडून आता ‘कॅशलेस’चे स्वागत करण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद दिला जात आहे.
अशात आपण का मागे रहावे असा विचार करीत महावितरणनेही आपले मोबाईल अॅप आणले आहे. सुरूवातीला वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेले हे अॅप क्लीष्ट असल्याच्या तक्रारीही होत्या. मात्र आता त्यात आवश्यक ते अपटेड करून ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी परिपूर्ण करण्यात आले आहेत. या अॅपमधून एका क्लीकवर आता वीज ग्राहकांना महावितरणच्या सर्व सुविधांचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आता दिवस व वेळ बघण्याची गरज पडणार नाही. शिवाय कधीही व कोठूनही आपले बील भरता येणार असून स्वत:शी निगडीत सर्वच माहिती याअॅप मधून जाणून घेता येणार आहे.
अॅपचा हाच फायदा घेत आता मोबाईल अॅपद्वारे बील भरणा करून सोबतच स्वत:च्या कनेक्शनबाबत वीज ग्राहक जाणून घेत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही आता बहुतांश जणांकडे मोबाईल उपलब्ध असल्याने एकाच्या मोबाईलवरून दुसराही फायदा घेऊ शकणार आहे व ते होत असल्याचेही दिसते. परिणामी ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी महावितरणचे हे पाऊल फायद्याचे ठरत असल्याचेही दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)
मोबाईल अॅप अत्यंत सुटसुटीत असून अॅपमुळे ग्राहकांना आता वीज बील भरण्यासाठी दिवस व वेळ बघावा लागणार नाही. कधीही व कुठूनही ग्राहकांना अॅपच्या माध्यमातून बील भरता येणार आहे. याशिवाय अॅपमध्ये अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी अॅपचा वापर करावा.
- एल.एम.बोरीकर
अधीक्षक अभियंता, गोंदिया