खून प्रकरणात एक वर्षाची शिक्षा
By admin | Published: March 5, 2016 01:58 AM2016-03-05T01:58:19+5:302016-03-05T01:58:19+5:30
लहान भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जिल्हासत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
गोंदिया : लहान भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जिल्हासत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी शुक्रवारी (दि.४) प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी केली.
बुधराम देवाजी टालटे (६०) रा. सालेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १३ नोव्हेंबर २०१२ आपला धाकटा भाऊ तुळशीराम टाकळे (५२) याच्या डोक्यावर काठीने मारून ठार केले. आरोपींच्या मोठ्या आईने एक एकर जमीन दोन्ही भावांना दिली होती. ती जमीन मुलीच्या लग्नासाठी मृतक तुळशीरामने ६० हजारात विक्री केली. ते पैसे लग्नात खर्च केले. त्या जमीनीचे अर्धे पैसे आम्हाला दे म्हणून आरोपी बुधराम देवाजी टालटे (६०) व त्याची पत्नी पारबता बुधराम टालटे (५५) या दोघांनी त्यांच्याशी भांडण करून पारबताने तुळशीरामचा हात पकडून ठेवला तर बुधरामने काठीने डोक्यावर मारले. यात तुळशीरामचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी केला. १३ नोव्हेंबर २०१२ हा दिवाळीचा दिवस असतांना पूजा-अर्चनेनंतर तुळशीराम व त्यांचे कुटुंबीय जेवण करीत असताना आरोपी बुधराम व त्याची पत्नी पारबता वाद करायला आली. यात काने मारल्याने तुळशीरामचा मृत्यू झाला.
तुळशीरामचा खून करण्याचा बुधरामचा मानस नसल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आली. या प्रकरणात १० साक्षदार तपासल्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने पारबताला निर्दोष ठरवित बुधरामला कलम ३०४ (२) नुसार एक वर्षाची शिक्षा व २ हजार रूपये दंड ठोठावला.
या प्रकरणात सरकारी वकील अॅण्ड. प्रशांत डोये यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रमुख महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)