ग्रामपंचायतींसाठीही आॅनलाईन नामांकन

By Admin | Published: July 5, 2015 02:01 AM2015-07-05T02:01:41+5:302015-07-05T02:01:41+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Online nomination for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठीही आॅनलाईन नामांकन

ग्रामपंचायतींसाठीही आॅनलाईन नामांकन

googlenewsNext

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींपैकी १८२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २५ जुलै होत असून त्यासाठी पहिल्यांदाच उमेदवारांना आॅनलाईन नामांकन दाखल करायचे आहेत. त्यामुळे संगणकाची कोणतीही माहिती नसणाऱ्या ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात २८ ग्रामपंचातीत सार्वत्रिक तर एका ठिकाणी पोटनिवडणूक, तिरोडा तालुक्यात १९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, आमगाव तालुक्यात २३ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, सालेकसा तालुक्यात ९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, देवरी तालुक्यात २९ सार्वत्रिक तर ३ ठिकाणी पोटनिवडणूक, सडक अर्जुनी तालुक्यात १९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, गोरेगाव तालुक्यात २६ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
गुरूवारी (दि.२) सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात पहिल्यांदाच ५० टक्के सरपंचपद विविध प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद- पंचायत समित्यांपाठोपाठ आता ग्रामपंचायतींवरही महिलाराज येणार असल्याने वर्षानुवर्षे सरपंचपदावर कब्जा करून बसलेल्या काही दिग्गजांना सरपंचपदापासून मुकावे लागणार आहे. यावेळी प्रथमच सर्व उमेदवारांचे नामांकन आॅनलाईन भरावे लागणार आहे. अनेक गावांत कॉम्प्युटर, इंटरनेट आणि प्रिंटरची सोय नाही. कुठे इंटरनेट जोडणीत अनेक समस्या असते. त्यामुळे आॅनलाईन नामांकन भरताना ग्रामीण उमेदवारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागू शकतो. गेल्या वर्षभरापासून लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या नंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि आता त्यापाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुका आल्याने या लोकशाही प्रक्रियेत गुंतून गेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कार्यकाळ दि.४ ते १० जुलै (रविवार सोडून) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याची दिनांक दि.१३ जुलै सकाळी ११ पासून. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख दि.१५ जुलै सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत. उमेदवारांना निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची दिनांक १५ जुलै दुपारी ४ वाजतानंतर, आणि मतदान दि. २५ जुलै सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत. निवडक पाच तालुक्याकरिता मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते ३ वाजेपर्यंत राहणार आहे. तर मतमोजणी दि.२७ जुलै रोजी होणार आहे.
७ पासून येणार नामांकनांना वेग
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार शनिवारपासून (दि.४) ते शुक्रवार १० जुलै पर्यंत (रविवारी बंद) असे फक्त ६ दिवस नामांकन दाखल करण्यासाठी मिळाले आहेत. शनिवारी पहिला दिवस असताना नामांकनासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रविवारी (दि.५) सुटी राहणार आहे. तर सोमवारी (दि.६) जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे बहुतांश लोक त्यात व्यस्त राहतील. अशा परिस्थितीत दि.७ ते १० जुलै हे शेवटचे चार दिवसच नामांकनासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.
आठही पं.स.सभापतींचे आरक्षण जाहीर
निवडणूक यंत्रणेने शनिवारी (दि.४) जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण पुढील अडीच वर्षाकरिता जाहीर केले. त्यात गोंदिया पं.स. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिला याकरिता, तिरोडा नामाप्र, आमगाव सर्वसाधारण महिला, सालेकसा सर्वसाधारण, देवरी अनुसूचित जमाती महिला, सडक-अर्जुनी सर्वसाधारण महिला, गोरेगाव सर्वसाधारण, तर अर्जुनी मोरगावचे सभापतीपद सार्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे संंबंधित प्रवर्गातील कोण उमेदवार त्या पदावर बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Online nomination for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.