डांर्गोलीत केवळ दहा दिवसांचा पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 09:19 PM2019-06-12T21:19:51+5:302019-06-12T21:20:14+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दहा दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला प्रकल्पात सुध्दा ०.८३ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात वाढ झाली आहे.
समस्या बिकट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दहा दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला प्रकल्पात सुध्दा ०.८३ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात वाढ झाली आहे. येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोंदिया शहराला डांर्गोलीजवळ उभारण्यात आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागातंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि विहिरींमध्ये मोजकाच पाणीसाठा होता. तर मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर परिणाम झाला आहे. शहरावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून कालव्याव्दारे पाणी आणून मात केली. आत्तापर्यंत पुजारीटोला धरणातून दोनदा पाणी सोडून ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजने पर्यंत पोहचविण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला फारसे तोंड द्यावे लागले नाही. मात्र वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील सिंचन साठ्यात सुध्दा झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यात पुजारीटोला प्रकल्पाचा सुध्दा समावेश आहे. या प्रकल्पात बुधवारी (दि.१२) केवळ ०.८३ टक्के पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे आता या प्रकल्पातून सुध्दा शहराला पाणी मिळण्याची आशा मावळली आहे. डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींनी सुध्दा तळ गाठला असून त्यात केवळ शहराला १० दिवस पाणी पुरवठा होवू शकेल ऐवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात जोराचा पाऊस न झाल्यास शहरात पाणी बाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरवासीयांना सुध्दा ग्रामीण भागातील गावकऱ्यांप्रमाणे पाण्यासाठी तीन चार कि.मी.पायपीट करावी लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यावर नेमका काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कालीसरारचा पर्याय
पुजारीटोला प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याने या प्रकल्पातील पाणी शहरवासीयांना मिळण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करण्याची वेळ आल्यास कालीसरार प्रकल्पातील पाणी पुजारीटोला प्रकल्पात सोडून ते पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचा प्लॉन जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तयार केला आहे.
कायमस्वरुपी उपाय योजनेचा अभाव
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून तीन वर्षांपूर्वी डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात १०० कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र यानंतरही मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही योजना तयार करतांना काही तांत्रीक त्रृटी राहिल्याची माहिती आहे. त्याचाच फटका शहरवासीयांना करावा लागत आहे.
दरवर्षी बंधाऱ्यावर खर्च
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे दरवर्षी डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्यासाठी नदीपात्रात सिमेंटच्या चुंगड्यामध्ये रेती भरुन बंधारा तयार केला जातो. यासाठी चार पाच लाख रुपये खर्च केले जातात. पण यानंतर पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यात यश येत नसल्याने हा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे.
मध्यम व लघू प्रकल्पाची स्थिती गंभीर
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम,लघू प्रकल्प आणि मामा तलावांची स्थिती सुध्दा गंभीर आहे. ९ मध्यम प्रकल्पात ५.१६ टक्के, २२ लघू प्रकल्पात ५.९३ टक्के आणि ६५ मामा तलावांमध्ये ५.९५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.