लाखो भाविकांसाठी केवळ १० शौचालयांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:46 AM2019-02-06T00:46:48+5:302019-02-06T00:47:24+5:30
कचारगडच्या रुपात सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतीक व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी आपले पारंपरिक व सांस्कृतिक अनुष्ठान पार पाडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाजबांधव येथे येतात.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कचारगडच्या रुपात सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतीक व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी आपले पारंपरिक व सांस्कृतिक अनुष्ठान पार पाडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाजबांधव येथे येतात. धनेगावच्या परिसरात राष्ट्रीय महासंमेलन व राष्ट्रीय गोंडीयन सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्या आदिवासींची संख्या लाखोच्या घरात असते.पाच दिवस हा महोत्सव चालतो. त्यामुळे पाचही दिवस भाविक उपस्थित राहतात. मात्र याठिकाणी भाविकांसाठी विविध सोयी सुविधांचा अभाव असून लाखो भाविकांसाठी केवळ १० शौचालये आहेत. तर स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने भाविकांना उघड्यावरच आंघोळ करावी लागते.
कचारगड देवस्थान गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी धनेगाववरुन ३ कि.मी.चा प्रवास असून या दरम्यान स्वच्छतागृह व शौचालय उपलब्ध नाही. धनेगाव येथे संमेलन परिसरात एकूण आठ शौचालय आणि प्रसाधनगृह पडक्या स्वरुपात आहेत. तसेच धनेगावच्या टेकडीवर भोजन वाटप परिसरात दोन स्नानगृह व दोन शौचालयाची व्यवस्था आहे. असे एकूण दहा शौचालय व स्नानगृहाची सोय आहे. परंतु कचारगड यात्रेदरम्यान पाच दिवस प्रत्येक दिवशी लाखोच्या संख्येत भावीक येथे मुक्कामी असतात. अशात त्यांना प्रात: विधी करण्यासाठी शौचालय व स्नानगृहाची गरज असते. परंतु त्यांना येथे ही सोय उपलब्ध होत नाही. धनेगाव हे एक छोटेसे आदिवासी गाव असून या गावात गरीब मोलमजुरी करणारे लोक राहतात. येथील स्थानिक लोक सुद्धा लाखो भाविकांना सोयी उपलब्ध करुन देण्यास असमर्थ आहेत. अशात बाहेर प्रातांतून आलेल्या भाविकांना मोफतच नाही तर पैशाने सुद्धा मुलभूत सोयी-सुविधा मिळत नाही. याकडे मात्र मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आवश्यक सोईसुविधांचा अभाव
कचारगड यात्रे दरम्यान येणाºया भाविक महिला-पुरुषांना अंघोळीसाठी स्नानगृह व शौचालय उपलब्ध होत नसल्याने त्यांना जंगलातच उघड्यावरच शौचास जावे लागते. तसेच अंघोळ सुद्धा उघड्यावर करावी लागते. हे येथे येणाऱ्या भाविकांचे दुर्देवच म्हणावे लागेल. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये अधिकारी कर्मचारी आणि प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असतो. परंतु येथे त्यांना आवश्यक सोईसुविधा मिळत नाही.
३० ठिकाणी तात्पुरते शौचालय
शासनाच्यावतीने शौचालयाच्या सोयीबाबत माहिती घेतली असता बांधकाम विभागाच्या एका अभियंताने धनेगाव येथे खालील परिसरात १५ व वरच्या परिसरात १५ असे एकूण ३० ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.