फक्त २१ टक्के तरुणांचेच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:06+5:302021-07-16T04:21:06+5:30
कपिल केकत गोंदिया : सन २०११ मधील जनगणनेच्या आधारे जिल्ह्यात १२९९६७० नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. यात सुमारे ...
कपिल केकत
गोंदिया : सन २०११ मधील जनगणनेच्या आधारे जिल्ह्यात १२९९६७० नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. यात सुमारे ६२५००० एवढी संख्या १८ ते ४४ वयोगटातील तरुणाईची अंदाजित करण्यात आली आहे. मात्र, २२ जूनपासून सुरू झालेल्या या वयोगटातील लसीकरणानंतरही अद्याप फक्त २०.६६ टक्के तरुण व युवांनीच लस घेतल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, निर्माण होत असलेला लसींचा तुटवडाही याला कारणीभूत आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू असून आतापर्यंत ५११९५४ नागरिकांचे लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत जिल्ह्यात ३९.३९ टक्के लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला १२९९६७० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून तेव्हाच जिल्हा १०० टक्के लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत येणार व कोरोनाचा धोकाही यामुळे कमी होणार यात शंका नाही. मात्र, एवढ्यानंतरही आतापर्यंत फक्त ३९ टक्के लसीकरण झाले असल्याने आणखी गती वाढविण्याची गरज दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात वयोगटनिहाय बघितल्यास बुधवारपर्यंत (दि.१४) प्रथम क्रमांकावर ४५-६० हा गट असून या गटातील २०८६०६ नागरिकांनी लसीकरण करवून घेतल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर १८-४४ गट असून या गटातील १२९१७८ तरूण व युवांनी म्हणजेच फक्त २०.६६ टक्केच लसीकरण झाल्याचे दिसत आहे. यात ११९८४५ तरुणांनी पहिला डोस घेतला असून ९३३३ तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे असले तरीही जिल्ह्यातील सुमारे ६२५००० तरुणांचे लसीकरण करावयाचे असल्याने लसीकरणाला आणखी गती देण्याची गरज दिसून येत आहे.
------------------------------------
फक्त ८ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस
जिल्ह्यात आतापर्यंत ५११९५४ नागरिकांचे लसीकरण झाले असून लसीकरणात जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. मात्र, या लसीकरणाची टक्केवारी बघितल्यास फक्त ३९.३९ टक्केच लसीकरण झाले आहे. यात ४०८१४६ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून १०३८०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, फक्त ७.९९ टक्के नागरिकांनीच दुसरा डोस घेतल्याचे दिसते. मात्र, कोरोनापासून सुरक्षेसाठी नागरिकांना लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याने दुसरा न लावलेल्यांनी वेळीच आपला डोस घेण्याची गरज आहे.
-------------------------------
आज मिळणार कोव्हीशिल्डचे १८००० डोस
जिल्ह्यात मध्यंतरी लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने कित्येकदा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला. परिणामी कित्येक नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले. याचा परिणाम जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण मोहिमेवरच पडला आहे. मात्र, सोमवारी जिल्ह्याला २६००० डोस मिळाल्यानंतर आता लसीकरण सुरू असून गुरुवारी (दि.१५) रात्री कोव्हीशिल्डचे आणखी १८००० डोस मिळणार आहेत. त्यामुळे आता पुढचे काही दिवस लसीकरण सुरळीत सुरू राहणार.