सिंचन प्रकल्पात फक्त ३१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:53 PM2018-10-27T21:53:09+5:302018-10-27T21:54:15+5:30
ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.
यामुळे येणारा काळ कठीणच म्हणावा लागणार असून आजपासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. यंदा जिल्ह्यात सप्टेंंबर महिन्यापर्यंत ८२ टक्के पाऊस झाला. चांगला पाऊस बरसला असे म्हटले जात असताना परतीच्या पावसाने दगा दिल्याने सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरली नाहीत. याचा प्रभाव धान पिकावरही पडला असून पावसाअभावी जिल्ह्यातील काही भागांत धान पिकाचे नुकसानही झाल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पांतून पाणी सोडले जात आहे. परिणामी इटियाडोह प्रकल्पात आता ४१ टक्के व सिरपूर प्रकल्पात फक्त २७ टक्के पाणीासाठा आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात फक्त ५८ टक्के पाऊस पडला होता. परिणामी जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ दिसून आली होती. आता यंदाची पाणीसाठयाची आकडेवारी बघून शासनाची चिंता वाढली असल्याचे दिसते. यामुळेच राज्य शासनाने जिल्ह्यातील देवरी, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले आहे. पाटबंधारे विभागानुसार, मध्यम प्रकल्पातील ९ प्रकल्पांत २८.५९ टक्के, लघु प्रकल्पांतर्गत २२ प्रकल्पांत ३३.०७ तर ३८ मालगुजारी तलावांत ३९.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
चिरचारबांध तलाव आटला
पाणीसाठा घटत चालला असतानाच आमगाव तालुक्यातील चिरचाडबांध तलाव मात्र आताच कोरडे पडले असून तलावात पाणीसाठाच नाही. मामा तलावांतर्गत कोसबीबकी तलावात १.३५ टक्के, ककोडी ९.१८ टक्के, तेढा ३.३२ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा प्रकल्पात ८.१६ टक्के तर लघु प्रकल्पांतर्गत भदभद्या प्रकल्पात ६.२६ टक्के, गुमडोह ४.२२, रिसाळा ३.८२, सोनेगाव ८.२३, सडेपार ७.०६, सेरपार ५.७० टक्के पाणीसाठा आहे. या तलावांची स्थिती बघता येत्या डिसेंबर महिन्यापूर्वीच हे तलाव कोरडे पडू शकतात असे दिसून येत आहे. याशिवाय, बोदलकसा तलावात १७.९१ टक्के, चूलबंद १९.३३, खैरबंदा २१.७९, रेंगेपार २३.५९, आक्टीटोला १६.५३, पांगडी २५.८५, रेहाडी १०.२५, राजोली १३.०१, कोकणा १९.४८, खाडीपार २१.७०, नांदलपार १७, भानपूर १०.६६ तर बोपाबोडी तलावात १५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.