पालिकेच्या तिजोरीत फक्त ५,३१० रूपये
By admin | Published: July 1, 2014 01:33 AM2014-07-01T01:33:46+5:302014-07-01T01:33:46+5:30
शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. पक्ष प्रमुख येणार असल्याने जिल्हा शिवसेनेने त्यांचे जंगी स्वागत केले. यासाठी शहरात बघावे तिकडे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मोजावे
शहर होर्डिंग्समय : शिवसैनिकांनी कर टाळला
गोंदिया : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. पक्ष प्रमुख येणार असल्याने जिल्हा शिवसेनेने त्यांचे जंगी स्वागत केले. यासाठी शहरात बघावे तिकडे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मोजावे तर लाखो रूपयांचे फक्त होर्डींग्स लावण्यात आल्याचे दिसले. त्यापैकी मोजक्याच होर्र्डिंग्सचे पैसे नगर पालिकेला कराच्या रूपात मिळाले.
या होर्डिंग्जयुद्धात नगर परिषदेला बराच कर मिळणे अपेक्षित होते. पण हा कर बुडवून कार्यकर्त्यांनी होर्डींग्सच्या मोबदल्यात पालिकेत फक्त पाच हजार ३१० रूपयांचा कर भरला असल्याचे दिसून आले. त्यामुळे लाखो रूपयांच्या या उलाढालीत पालिकेच्या तिजोरीत मात्र पाच हजारच आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने फुंकल्याचे मानले जाते. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: येणार असल्याने येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांत उत्साह संचारला होता. बघावे तेथे शिवसेनेचे होर्डिंग्स लावण्यात आल्याचे दिसले. वास्तविक अवघे शहरच भगवे झाल्याचे बघावयास मिळाले. लाखो रूपयांचा खर्च यासाठी जिल्हा शिवसेनेने केला असल्याचे उघड आहे. शहरातील मोक्याची एकही जागा सुटलेली दिसून आली नाही.
शिवसेनेने शहरात लावलेल्या या होर्डींग्सची मोजणी केली असता शेकडोंच्या संख्येत त्यांची गणती होऊ शकते. शिवसेनेने आपल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंना तर खुश करून घेतले. यातून मात्र पालिकेला चांगलाच तोटा सहन करावा लागला आहे. असे असतानाही नगर परिषदेने मात्र कोणावरही दंड आकारला नाही.
शहरात लावण्यात येणाऱ्या या होर्डींग्सच्या मोबदल्यात प्रत्येकालाच पालिकेत कर भरावा लागतो. त्यानुसार शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी सुद्धा पालिकेत कर भरला. मात्र शेकडो होर्डींग्सच्या मोबदल्यात भरण्यात आलेला हा कर तुटपुंजा आहे.
यात राजकुमार कुथे यांनी दोन हजार ९१० रूपयांचा तर मुकेश शिवहरे यांनी दोन हजार ४०० रूपयांचा कर भरल्याचे नगर परिषदेतून सांगण्यात आले. वास्तविक शहरात लावण्यात आलेल्या या होर्डींग्लची मोजणी केली असता नगर परिषदेला चांगलीच रक्कम कर स्वरूपात मिळायला हवी. मात्र फक्त पाच हजार रूपये पालिकेच्या तिजोरीत भरण्यात आल्याने नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात नेहमीच होर्र्डिंग्सचे युद्ध पेटलेले असताना नगर परिषद अजूनही यावर गांभिर्याने कारवाई करताना दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)