‘माझी कन्या भाग्यश्री’साठी फक्त ५४९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:51 PM2019-07-01T21:51:49+5:302019-07-01T21:52:03+5:30
स्त्री भ्रृणहत्या समाजात होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना अंमलात आणली. ही योजना १ आॅगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर जन्मास आलेल्या मुलींसाठी सुरू करण्यात आली. असे असतानाही मागील दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील फक्त ५४९ अर्ज या योजनेच्या लाभासाठी आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्त्री भ्रृणहत्या समाजात होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना अंमलात आणली. ही योजना १ आॅगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर जन्मास आलेल्या मुलींसाठी सुरू करण्यात आली. असे असतानाही मागील दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील फक्त ५४९ अर्ज या योजनेच्या लाभासाठी आले आहेत. यावरून या योजनेविषयी आजही समाजात उदासिनता दिसून येत आहेत.
एक किंवा दोन कन्या रत्न असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा, बालगृहातील मुलींनाही हा लाभ देण्यात येईल, एक लाख ते सात लाख ५० हजारांपर्यंत उत्पन्न असणारे यासाठी पात्र असून माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. महिला बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत या लाभासाठी फक्त ५४९ अर्ज करण्यात आले.
यांतर्गत, गोंदिया- १ या कार्यालयामार्फत ६६, गोंदिया- २ कार्यालयामार्फत १३३, अर्जुनी-मोरगाव ४३, सालेकसा १८, देवरी तीन, सडक-अर्जुनी ९१, आमगाव ४६, तिरोडा ६०, गोरेगाव ५१, गोंदिया नागरीमार्फत ३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात एकच पालक (आई किंवा वडील) असलेले ८५ लाभार्थी, २ कन्या असलेले पालक ४६५, एक पालक असलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त चौघांचे खाते उघडण्यात आले आहेत. तर दोन पालक असलेल्या लाभार्थ्यांचे ५०९ जणांचे खाते उघडण्यात आले आहेत. यात १२० लाभार्थ्यांचे डीडी तयार करून महिला विकास विभागाला मिळाले आहेत. ९९ लाभार्थ्यांचे डीडी तयार करण्यासाठी बँकेकडे पाठविण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका कन्येवर आॅपरेशन केल्याचा पुरावा, रेशनकार्डची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, बॅँक पासबुक व अपत्याचा जन्म दाखला जोडावा लागतो.
असे आहे लाभाचे स्वरूप
या योजनेच्या लाभासाठी एक कन्या असल्यास ५० हजार रूपये, दोन कन्या असल्यास २५ हजार रूपये ठेव, मुलगी सहा वर्षाची आणि १२ वर्षाची झाल्यास ठेव रकमेवरील व्याज मिळेल तसेच १८ वर्ष पूर्ण झाल्यांतर मुद्दल व व्याज मिळेल. लाभार्थी मुलगी व तिची आई यांचे संयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून दोघांना एक लाखांचा अपघात विमा पाच हजार ओव्हरट्रॉप, मुलीने वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यास विम्याची रक्कम एक लाख रूपये बँकेच्या खात्यात टाकली जाते. एक कन्या अपत्य असलेल्या कुटुंबातील भाग्यश्रीच्या आजी-आजोबांना सोन्याचे नाणे दिले जाईल.
एक कोटी २९ लाखांची मागणी
गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी एक कोटी २९ लाख २५ हजार रूपयांचे अनुदान आवश्यक आहे. तशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ देण्यात येईल.