केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 09:11 PM2019-04-13T21:11:56+5:302019-04-13T21:12:34+5:30

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे.

Only 7 days of enough water supply | केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : वैनगंगेचे पात्र पडले कोरडे, बंधाऱ्याचा उपयोग नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना केवळ ७ दिवस पाणी पुरवठा करता येईल ऐवढाच पाणीसाठा वैनगंगेच्या पात्रात शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुढील आठवड्यात पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
महिनाभरापूर्वी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बंधाºयाचा सुद्धा कुठलाच उपयोग झाला नसून विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने यंदा एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागणार आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत १७ कि.मी.अंतरावरील डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहरात प्राधिकरणाचे १२ हजारावर ग्राहक आहे. त्यांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथून वैनगंगा नदीच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुडवा येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईन व्दारे आणले जाते. यामुळे शहरातील जवळपास दीड लाख नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर यंदा ही तिच स्थिती निर्माण झाली आहे.
वैनगंगा नदीच्या पात्रात सध्या केवळ ७ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाची सुध्दा चिंता वाढली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा होता.त्यामुळे गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. कालव्याच्या माध्यमातून प्रथम ३.०१५ एमएमक्यू आणि दुसऱ्यांदा २.५१७ एमएमक्यू पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहोचविण्यात आले होते. तर यंदा देखील तीच स्थिती असून यावर्षी देखील शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोला धरणावरच आहे.

शंभर कोटींची योजना ठरतेय नाममात्र
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात १०० कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र ज्या वर्षी योजना तयार करण्यात आली त्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी विहीर तयार करण्यात आली आहे. त्या परिसरात पाणी राहात नसल्याने दरवर्षी पाण्याची पातळी खालावते.त्यामुळे या परिसरात पाणी साचून राहावे याकरिता कायमस्वरुपी बंधारा तयार करण्याची गरज आहे.
बंधारा तयार करण्याचा प्रस्ताव
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या समन्वयातून या ठिकाणी बंधारा तयार केल्यास यावर कायम स्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे बंधारा तयार करण्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारला पाठविण्यात आला आहे.या प्रस्तावाला आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीला केव्हा मंजुरी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

दरवर्षी  बंधाऱ्यावर खर्च
मागील दोन तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सिमेंटच्या चुंगड्यापासून वैनगंगा नदीच्या पात्रात तात्पुरता बंधार तयार केला जातो.दरवर्षी यासाठी दोन तीन लाख रुपयांचा खर्च केला जातो. मात्र याचा सुध्दा कसलाच उपयोग होत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ जात आहे.
सोमवारपासून एकच वेळ पाणी पुरवठा
वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सोमवारपासून (दि.१५) शहरवासीयांना दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Only 7 days of enough water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.