जिल्ह्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांनी केली ई-पीक अॅप नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:11 PM2024-09-10T17:11:46+5:302024-09-10T17:12:21+5:30
१५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत : अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईला पात्र ठरण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक अॅपवर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. ई-पीक अॅपवर नोंदणी केल्यास शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते. मात्र, यंदा खरीप हंगामात २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ १ लाख १२ हजार ८७२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
ई-पीक अॅपवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असून, मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे शासन व विमा कंपनीने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची झालेली नुकसानभरपाई व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ई-पीक अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी असून, यापैकी आतापर्यंत १ लाख १२ हजार ८७२ शेतकऱ्यांनी ई- पीक अॅपवर नोंदणी केली आहे. तर अर्धे शेतकरी अजूनही यापासून वंचित असल्याने या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपूर्वी ई-पीक अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागेल.
आतातरी करा पीक पाहणी
सन २०२४ च्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणीला सुरूवात झाली असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे. ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. शेतकरी आपल्या स्वतःच्या मोबाइल अॅपवरून सातबारावरील विविध पिकांची नोंदणी करू शकतील. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी, जेणेकरून भविष्यात शासनाकडून अनुदान मिळण्यास अडचण येणार नाही.
तालुका पीक नोंदणी केलेले शेतकरी
अर्जुनी मोरगाव १६०३५
आमगाव १३८३०
गोरेगाव १३२१०
गोंदिया १६९३१
तिरोडा २२६००
देवरी १०७६६
सडक अर्जुनी १०२७४
सालेकसा ९२२६
एकूण ११२८७२