तीन वर्षांत केवळ एकच अपघात
By admin | Published: May 30, 2017 12:56 AM2017-05-30T00:56:59+5:302017-05-30T00:56:59+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागरूकता सप्ताह २९ मे ते २ जून २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
मानवरहीत फाटक : आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागृती सप्ताह सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागरूकता सप्ताह २९ मे ते २ जून २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या संख्येनुसार रेल्वे फाटकांवर अधिकतर अपघात वाहन चालक व पायी चालणाऱ्यांमुळे होते. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत सन २०१४-१५ मध्ये मानवरहीत समपार फाटकावर एक अपघात घडला. परंतु सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये एकही अपघात घडला नाही.
दपूम रेल्वे नागपूर मंडळाचे रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या विस्तृत कार्ययोजनेंतर्गत नागपूर मंडळांतर्गत नागपूर मंडळाच्या संरक्षण विभागाचे वरिष्ठ मंडळ संरक्षण अधिकारी ए.एम. मसराम यांच्या नेतृत्वात मंडळातील रेल्वे कर्मचारी, भारत स्काऊट व गाईड तसेच नागरिक सुरक्षा संघटनेच्या सहकार्याने २९ मेपासून सतत मंडळाच्या विविध समपार फाटक, बाजार, पेट्रोल पंप, स्थानक, रेल्वे गाड्या व बस स्थानकावर प्रवासी व नागरिकांंना संरक्षणाबाबत जागृत करतील. त्यामुळे अपघातांना पूर्णत: टाळले जावू शकेल तसेच स्वच्छतेच्या बाबतही जागृती करण्यात येणार आहे.
रेल्वेचे भारत स्काऊट गाईड, नागरी सुरक्षा संघटन व दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे विविध स्थानकांच्या समपार फाटकांवर पॉम्प्लेट्स वितरित करण्यात येतील. नुक्कड नाटकसुद्धा आयोजित करण्यात येत आहेत. शिवाय ग्रामपंचायत, पेट्रोल पंप, बस स्थानक, बाजार, चौरस्त्यांवर जागृतीसाठी पॉम्प्लेट्स वितरित करण्यात येतील. रेडिओ, टीव्ही, लोकल चॅनल व उद्घोषणा प्रणालीचा उपयोग करून प्रवाशांमध्ये संरक्षणाप्रति जागरूकता करण्यात येईल. त्यामुळे समपारवर होणाऱ्या अपघातांना पूर्णत: समाप्त करण्यासाठी सर्व प्रयत्न होवू शकेल.
जिल्ह्यात मानवरहीत समपार फाटकांची संख्या अधिक आहे. या फाटकांवर अपघात होवू नये, याच प्रमुख उद्देशाने सदर जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.