आत्मविश्वासानेच प्रगतीचे शिखर गाठता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:25 PM2018-02-24T21:25:58+5:302018-02-24T21:25:58+5:30
शालेय जीवनात वावरत असताना विद्यार्थ्यांनी आशावादी जीवन जगून उच्च ध्येय मनाशी बाळगावे. स्वत:ची तुलना इतरांशी न करता विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी.
ऑनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : शालेय जीवनात वावरत असताना विद्यार्थ्यांनी आशावादी जीवन जगून उच्च ध्येय मनाशी बाळगावे. स्वत:ची तुलना इतरांशी न करता विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी. भविष्यात मोठ्या पदावर आरुढ होण्याची अभिलाषा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रखर आत्मविश्वास विद्यार्थ्यानी बाळगावे. कारण आत्मविश्वासानेच प्रगतीचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी प्रशांत गाडे यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी मानवता विद्यालयाचे भाग्यवान फुल्लुके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अशोक रामटेके, संतोष टेंभुर्णे, अनिरुद्ध रामटेके, एकनाथ रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना गाडे यांनी, आजचा विद्यार्थी हा चौकस बुद्धीचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही कमी नाही. परंतु विद्यार्थ्यांनी आपल्यामधील न्यूनगंड काढावा. नकारात्मक विचाराला विद्यार्थ्यांनी स्थान देऊ नये. यशाचे परमोच्च शिखर गाठण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यानी इयत्ता ५ वी पासून तयारी करावी. नित्यनेम अभ्यास केल्यास वयाच्या २२ व्या वर्षी जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे सांगितले.
संचालन अमरचंद ठवरे यांनी केले. प्रास्ताविक भाग्यवान फुल्लुके यांनी मांडले. आभार भारत उके यांनी मानले.
शिबिरात गावातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनो अवांतर वाचन करा
शिबिरात मार्गदर्शन करीत असतानाच गाडे यांनी विद्यार्थ्यांना काही टिप्सही दिल्या. यात त्यांनी, स्वत:ला कमी लेखू नये व ध्येय लहान वा कमी ठेवणे हा गुन्हा आहे. आपल्याला काही वेगळे करुन दाखवायचे आहे तर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यालयीन स्तरापासून तयारी करावी. जिद्द, चिकाटी, नियोजनामुळे मोठ्या संकटावर मात करता येते. सुसंस्कारीत भाग्य लाभण्यासाठी चांगल्या मित्राची निवड करा. चिंतन, मनन अवांतर वाचन करण्याचा सल्ला गाडे यांनी दिला.