पाच पैकी दोनच शिक्षक हजर
By admin | Published: September 17, 2016 02:13 AM2016-09-17T02:13:55+5:302016-09-17T02:13:55+5:30
सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पुतळी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ असून १०३ विद्यार्थी संख्या आहे
पुतळी शाळेतील प्रकार : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पुतळी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ असून १०३ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत मुख्याध्यापकासह पाच शिक्षक कार्यरत असून गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला भेट दिली असता पाचपैकी दोनच शिक्षक हजर असल्याचे दिसले. तर तीन नदारद होते.
या शाळेचे मुख्याध्यापक जी.के. चौधरी हे मुख्यालयी न राहता ३५ किलोमीटर अंतरावरुन येणे जाणे करतात. त्यामुळे उशिरा येणे लवकर जाणे, तर अनेकदा बुट्टीही मारतात याची भनक गावकऱ्यांना होतीच. त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व काही गावकऱ्यांनी शाळेला भेट दिली. यात पाचपैकी दोनच शिक्षक हजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या शाळेतील एकही शिक्षक मुख्यालयी राहत नाही. सर्व बाहेरुन येणे-जाणे करतात. यामध्ये मुख्याध्यापक चौधरी वेळेनंतर येणे व वेळेच्या आत जाणे हा प्रकार मागील चार वर्षापासून सुरु आहे. पुतळी हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी या शाळेकडे ढूकंूनही पाहत नाही. याबरोबरच केंद्रप्रमुखाची भूमिका सुद्धा संशयास्पद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.
विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकच आपल्या कर्तव्यात कसूर करुन विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करत असेल तर त्यांच्या भविष्याचे काय? असा सवालही पालक वर्गाकडून केला जात आहे.
या प्रकरणाची त्वरीत चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही व्हावी अन्यथा गावकरी शाळेला कुलूप ठोकणार अशा आशयाचे निवेदन जि.प. अध्यक्ष, खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उपसभापती व या क्षेत्राच्या जि.प. सदस्य सरीता कापगते यांना दिले आहे. (वार्ताहर)