वैनगंगेत मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:39 PM2019-01-10T23:39:44+5:302019-01-10T23:41:25+5:30
शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
्नेगोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेर मात्र पुजारीटोलाकडे धाव घ्यावी लागणार आहे.
मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात पाणी पेटले होते. नदी, नाले व तलावांत पाणी नसल्याने मागीलवर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. तर पाणी टंचाईची झळ गोंदिया शहरालाही बसणार होती. वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहराला पाणी पुरवठा खंडीत होणार होता. त्यामुळे पाणी पुरवठयात कपात करण्याची पाळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर आली होती. अशात कधी नव्हे ते सुमारे ९० किमी.अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडला व त्यामुळे मागील वर्षीसारखीच पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत.
यंदा मात्र येत्या मार्च महिन्यापर्यंत पुरणार एवढा पाणीसाठा वैनगंगा नदीत असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मागील वर्षी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते . तीच परिस्थिती यंदाही उद्भवणार आहे. त्यादृष्टीने मार्च महिन्याच्या शेवटी प्रयत्न सुरू केले जाणार आहे. यासाठी मजिप्राने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षित केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंथन
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सभेत शहरातील पाणी टंचाईच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत पुजारीटोला धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी ज्याप्रमाणे कालवे व नाल्यांतून डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाणी पोहचविण्यात आले होते. त्यानुसार यंदाही तशीच योजना केली जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात येणार आहे.
शहराला दूषित पाण्याचा पुरवठा
शहरात मागील २-३ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील मामा चौकात नालीसाठी खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. यावर मजिप्राने लगेच उपाययोजना केली. मात्र पाईप लाईनमध्ये माती गेल्याने दूषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.