उघड दार देवा आता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:37+5:302021-06-20T04:20:37+5:30
गोंदिया : मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहतूक, व्यापार-उद्योगांसह मंदिरांवरही बंदी लावण्यात आली होती. तेव्हा लॉकडाऊन ...
गोंदिया : मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहतूक, व्यापार-उद्योगांसह मंदिरांवरही बंदी लावण्यात आली होती. तेव्हा लॉकडाऊन शिथिल करून सर्वच काही उघडल्यानंतर सर्वांत शेवटी मंदिरांना उघडण्याची परवानगी शासनाने दिली होती. आता दुसऱ्या लाटेतही तोच प्रकार घडत आहे. दुसरी लाट ओसरत असताना शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असून, सर्वच काही पूर्ववत झाले आहे. मात्र, यंदाही मंदिर लॉकडाऊन असून, भाविकांना मंदिराबाहेरूनच देवदर्शन घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, मंदिर असल्याने भाविकांना आपल्या देवाचे दर्शन घेता येत नसल्याची खंत असतानाच या मंदिरावर उदरनिर्वाह चालविणाऱ्या पुजारी व पूजा साहित्य दुकानदारांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. मंदिर बंद असल्याने भाविक येत नसून चढावे व दानही बंद आहे. त्यातल्या त्यात पूजा साहित्यांची विक्री होत नसल्याने पुजारी व दुकानदार अडचणीत आले असून, सर्वच ‘उघड दार देवा आता...’ अशी आर्त हाक देवाला देत आहे.
----------------------------------
किती दिवस कळशाचेच दर्शन
कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून मंदिर बंद आहे. आता पुजारी मुख्य गेट बंद ठेवत असून, तेथे लावण्यात आलेल्या जाळीतूनच देवदर्शन घ्यावे लागत आहे. शासनाने सर्व काही खुले करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरांनाच सर्वांत शेवटी परवानगी दिली जाते. देवालाच कुलूपबंद करण्यात आले आहे.
- संजय इंगळे
(भाविक)
-------------------
मंदिरात देवदर्शन करूनच पुढे कामाला सुरुवात करण्याची सवय आहे. त्यामुळे आता मंदिर बंद असताना बाहेरूनच जाळीतून देवदर्शन करावे लागते. सर्व काही सुरळीत सुरू झाले असूनही मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. शासनाने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालून तरी मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी.
- विवेक जगताप
(भाविक)
------------------------------------
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर सर्व काही सुरू झाल्यानंतरही सर्वांत शेवटी दिवाळीनंतर मंदिर सुरू करण्याची परवानगी दिली होती. आता यंदाही सर्व काही सुरू झाले असून, मंदिर मात्र बंद आहे. मंदिरावरच आमचा उदरनिर्वाह होत असल्याने शासनाने मंदिरांबाबत आता निर्णय घेण्याची गरज आहे.
पंडित सुरेंद्र शर्मा (पुजारी)
----------------------------
आर्थिक गणित कोलमडले
मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची संख्याही कमी झाली आहे. शिवाय देवाला हार, फुल व प्रसाद चढविता येत नसल्याने आमची विक्रीही कमी झाली आहे. यामुळे आमची आर्थिक अडचण होत आहे. शासनाने अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे आमचाही विचार करावा.
- हर्ष कावडे (पूजा साहित्य विक्रेता)
---------------------
मागील वर्षी लॉकडाऊनचा मार सर्वाधिक आम्हाला बसला. आता यंदाही सर्व काही सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, मंदिर बंद असल्याने आमचा व्यापार ठप्प पडला आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने आमचा माल विकत नाही. मात्र, खर्च लागूनच आहेत. आता शासनाने परवानगी देण्याची गरज आहे.
- संजय टेहरा (पूजा साहित्य विक्रेता)