उघड्यावरील धानाने वाढविला बीपी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:01+5:302021-02-16T04:31:01+5:30
गोंदिया : शासन आणि राइस मिलर्स यांच्यात अद्यापही चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास ...
गोंदिया : शासन आणि राइस मिलर्स यांच्यात अद्यापही चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या पावसाचा फटका उघड्यावरील धानाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचा बीपी वाढला आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. यंदा धानाला हमीभाव चांगला मिळत असल्याने धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत २० लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ७ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. या दोन्ही विभागांतर्गत खरेदी केलेल्या धानाची राइस मिलर्सशी करार करून भरडाई करून शासनाकडे तांदूळ जमा केला; पण यंदा राइस मिलर्स असोसिएशनने मागील वर्षीचे इन्सेटिव्ह तसेच भरडाईचे दर निश्चित करण्याच्या मागणीला घेऊन धानाची उचल करून भरडाई करणे बंद केले आहे. मागील दोन महिन्यांपासून हीच स्थिती आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर लाखो क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. अशात आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास त्याचा फटका या धानाला बसू शकतो. त्यामुळेच या दोन्ही विभागांचा बीपी वाढला आहे.