सागाची खुलेआम तस्करी उघडकीस

By admin | Published: January 20, 2015 12:07 AM2015-01-20T00:07:03+5:302015-01-20T00:07:03+5:30

गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अवैधरीत्या सागाची लाकडे वाहतूक करणाऱ्या मिनी मेटॅडोअरला (एमएच ३५/के-२२७१) पकडले.

Open the seashore openly smuggling | सागाची खुलेआम तस्करी उघडकीस

सागाची खुलेआम तस्करी उघडकीस

Next

गोंदिया : गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अवैधरीत्या सागाची लाकडे वाहतूक करणाऱ्या मिनी मेटॅडोअरला (एमएच ३५/के-२२७१) पकडले. सदर वाहनासह सागाच्या लाकडांची किंमत सुमारे दोन लाख रूपये आहे. ही कारवाई रविवारी (दि.१८) रात्री ८ वाजता गोंदियाच्या निर्मल टॉकिजजवळ करण्यात आली.
मिनी मेटॅडोअर चालक व मालक राजेश बाबुलाल सोनुले (४२) रा. फुलचूर असे आरोपीचे नाव आहे. राजेश आपल्या वाहनात सागाची लाकडे भरून गोरेगाव मार्गावरून गोंदियाकडे येत असल्याची माहिती राऊंड आॅफिसर ए.एन. साबळे यांना मोबाईलवर मिळाली. त्यांनी त्वरित एसीएफ ठक्कर यांना फोन करून वाहन मागितले.
वाहन मिळताच ते निर्मल टॉकिजजवळ पोहचले व मदतीसाठी वनरक्षक फुंडे यांना बालावून घेतले. तेवढ्यातच सागाच्या लाकडांनी भरलेले वाहन आले. त्यांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालक राजेश सोनुले याने अंजनाची लाकडे असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष तपास केल्यावर ती सागाची लाकडे असल्याचे समजले. लाकडांची साल काढलेली होती. तेवढ्यातच राजेशसह असलेल्या दुसऱ्या इसमाने तिथून पळ काढला. जप्त करण्यात आलेली लाकडे ०.८०० घनमीटर असून त्यांची किमत २२ हजार रूपये व वाहनाची किमत मिळून दोन लाख रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही लाकडे मोठ्या गोल आकाराचे असून एकूण १० नग आहेत. सदर सागाची लाकडे नागझिरा अभयारण्याशी लागून असलेल्या मंगेझरी, आसलपाणी परिसरातील असण्याची शक्यता वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) आनंद मेश्राम यांनी व्यक्त केली. अवैध वाहतुकीच्या कलम २७, ४१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई एसीएफ ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम, राऊंड अधिकारी ए.एन. साबळे व वनरक्षक फुंडे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Open the seashore openly smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.