बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन ‘मुस्कान-२’
By admin | Published: December 30, 2015 02:19 AM2015-12-30T02:19:22+5:302015-12-30T02:19:22+5:30
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभाग आता आॅपरेशन ‘मुस्कान-२’ राबविणार आहे.
नरेश रहिले गोंदिया
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभाग आता आॅपरेशन ‘मुस्कान-२’ राबविणार आहे. नववर्षात १ ते ३१ जानेवारी या काळात हे आॅपरेशन राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात राबविण्यात आलेले आॅपरेशन मुस्कान यशस्वी झाल्यामुळे गृह मंत्रालयाच्या आदेशावरून हा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.
हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आॅपरेशन ‘मुस्कान’ जुलै महिन्यात राबविण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात सन २०१० पासून ३० जून २०१५ या काळात बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध या मोहिमेत घेण्यात आला. या काळात २४७ मुले व ५११ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यातील काहींचा शोध लागला तर काही स्वत:हून घरी परतले. त्यातूनच आॅपरेशन मुस्कानने केलेल्या कार्यात ३१ बालकांना पकडण्यात आले.
मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबविली होती. या मोहीमेला गोंदिया जिल्ह्यात भरभरून यश आले. अख्या महाराष्ट्रात या आॅपरेशन मुस्कानला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे या आॅपरेशमध्ये न मिळालेल्या बालकांसाठी व या अभियानानंतर हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन ‘मुस्कान-२’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
आॅपरेशन ‘मुस्कान-२’ हे अभियान राबविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी लावण्यात येणार आहेत. यांतर्गत बसस्थानके, रूग्णालय, उद्यान, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क साधला जाणार आहे.
सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा
या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई वडीलांच्या स्वाधीन करणे, आई वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलिस करतात. समितीने त्या बालकांना बालसुधारगृहात पाठविण्याचे सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना सोडून देतात. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा व ही बालके शोधण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
२६ बालके अद्याप बेपत्ता
१ ते ३१ जुलै या महिन्यात बेपत्ता असलेल्या ३१ बालकांना आॅपरेशन मुस्कान दरम्यान शोधून काढले होते. यातील ७ मुले व १६ मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर ७ मुले व एका मुलीला बालक समिती समोर सादर करण्यात आले. अशा एकूण ३१ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी २३९ मुले व ४९३ मुली पोलिसांना मिळाल्या आहेत. आताही गोंदिया जिल्ह्यातील २६ बालके बेपत्ता असून यात ८ मुले व १८ मुलींचा समावेश आहे.
मुख्य प्रवाहात आणणार
ज्या बालकांना आॅपरेशन मुस्कानच्या माध्यामातून पकडण्यात येते त्या बालकांचे मातापिता नसल्यास त्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची, राहण्याची, खाण्याची व झोपण्याची सोय शासन करणार आहे. पोलिसांनी त्या बालकांना पकडून मातापिता मिळाले तर त्यांना बालसुधार पाठविणार आहेत. त्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.