बेपत्ता बालकांच्या शोधार्थ ‘आॅपरेशन मुस्कान’

By Admin | Published: July 6, 2015 01:25 AM2015-07-06T01:25:58+5:302015-07-06T01:25:58+5:30

हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहिम जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे.

'Operation Smile' in search of missing children | बेपत्ता बालकांच्या शोधार्थ ‘आॅपरेशन मुस्कान’

बेपत्ता बालकांच्या शोधार्थ ‘आॅपरेशन मुस्कान’

googlenewsNext

पोलीस महासंचालकाचे पत्र : महिनाभर राबविणार मोहीम
गोंदिया : हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहिम जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पूर्ण जुलै महिन्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकांनाच त्यांचे बाळ आपल्या जीवापेक्षा जास्त किंमती असते. त्यामुळे आपल्या ‘काळजाचा तुकडा’ काही वेळासाठी नजरेआड झाला तर पालकांचा जीव कासावीस होऊ लागतो. अशात ज्यांची मुले अपहरण करण्यात आली किंवा हरवून गेली त्यांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच करता येऊ शकत नाही. अशा या पालकांना त्यांच्या काळजाचा तुकडा परत मिळवून देण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. यासाठी ते सर्वत्र हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या बालकांच्या शोधार्थ ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविणार आहेत.
पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेबाबत जिल्हा पोलीस विभागालाही पत्र आले असून जिल्ह्यात येत्या ३० जुलैपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले असून ते दररोज अशा मुलांचा शोध घेऊन नियंत्रण कक्षाला माहिती देतील. अपहरण झालेल्या मुलांपैकी काही मुले यांच्या पालकांकडे परत आली असल्यास त्यांची खात्री करून त्या बाबतची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी वेगवेगळे पथक तयार करून शोध मोहीम युध्द पातळीवर राबविणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी समन्वय ठेवून हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न महिनाभर केला जाणार आहे.
यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क करून त्यांना त्यांच्या पालकांकडे पोहचविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तर हरविलेल्या मुलामुलींची ओळख पटावी यासाठी त्यांचा ‘फोटो अल्बम’ तयार करून तो नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. हरविलेली किंवा घरातून निघून आलेली मुले सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करताना छायाचित्र काढून प्रसारीत केली जाणार आहेत. पोलीस विभागाकडून ही मोहिम राबविली जात असली तरी लोकसहभागाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नसल्याने पोलिसांनी नागरिकांना या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुला-मुलींचा आकडा मात्र बेपत्ता
हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात किती मुलामुलींचे अपहरण झाले किंवा ते बेपत्ता आहे, याची माहिती पोलीस विभाग लपवित आहे. चालू वर्षातील बेपत्ता किंवा अपहरणांची आकडेवारी नाही, आता आम्ही मागवित असतो असे स्थानिक गुन्हे शाखेतून सांगण्यात आले. जिल्ह्यात लहान मुलांच्या अपहरणाचा सर्वाधिक आकडा असावा यासाठी पोलीस विभाग हे आकडे लपवित असावे अशी शक्यता असू शकते.

Web Title: 'Operation Smile' in search of missing children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.