३७ हजार ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी
By Admin | Published: October 17, 2016 12:28 AM2016-10-17T00:28:13+5:302016-10-17T00:28:13+5:30
वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.
महावितरणची नवी योजना : १ नोव्हेंबरपासून होणार शुभारंभ
गोंदिया : वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे. महावितरणची ही नवी योजना येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ग्राहकांनी जेवढ्या लवकर या योजनेचा लाभ घेतला, तेवढा जास्त लाभही योजना देणार आहे.
वीजेचे देयक न भरल्याने त्यांची रक्कम वाढत जाते व देयक न भरल्याचा कालावधी वाढत गेल्यास वीज वितरण कंपनीकडून नाईलाजास्तव त्या ग्राहकांची कायमस्वरूपी वीज जोडणी खंडीत केली जाते. जिल्ह्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात असून अशा ग्राहकांची संख्या ३७ हजार ६३७ आहे. तर अशा या ग्राहकांवर २१ कोटी २८ लाख ५५ हजार २८५ रूपयांची थकबाकी असून त्यावर तीन कोटी ५४ लाख १० हजार ९८३ रूपयांचे व्याज थकून पडले आहे.
वीज पुरवठा खंडीत झाल्याने आणि मूळ व व्याजाची रक्कम मिळून एवढी रक्कम भरणे काहींच्या आवाक्याबाहेरही झाले असावे. परिणामी अशा या ग्राहकांकडून पुढाकार घेतला जात नाही. अशात वीज चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याचे प्रकारही घडतात. एकंदर यातून वीज कंपनीलाच फटका सहन करावा लागतो. शिवाय ग्राहकांना अंधारात ठेवणेही महावितरणच्या धोरणात नाही.
अशात ग्राहकांच्या घरातील दिवे पुन्हा उजळून निघावे व त्यांच्या घरातील अंधार दूर व्हावा यासाठी महावितरणने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ‘अभय’ योजना आणली आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना राबविण्यात येणार असून सहा महिने कालावधीची ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेत ग्राहकांना पुन्हा एकदा ‘अभय’ होण्याची संधी महावितरणकडून दिली जात आहे.
विशेष म्हणजे या योजनेतून कृषी व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना वगळण्यात आले असून फक्त कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. एकंदर ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली संधी चालून आहे. संधीचा लाभ घेऊन वीज पुरवठा खंडीत असलेले ग्राहक आपल्या घराला पुन्हा एकदा प्रकाशमय करू शकतील. (शहर प्रतिनिधी)