पर्यटनातून रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 12:55 AM2017-02-21T00:55:44+5:302017-02-21T00:55:44+5:30

निसर्गाने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गावोगावचे तलाव आणि घरेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचा उपयोग करीत पर्यटनाला चालना देण्यासोबतच ...

Opportunity for Employment from Tourism | पर्यटनातून रोजगाराची संधी

पर्यटनातून रोजगाराची संधी

Next

‘होम स्टे’चे देणार प्रशिक्षण : वैशिष्ट्यपूर्ण घरांची छायाचित्रे मागविली
गोंदिया : निसर्गाने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गावोगावचे तलाव आणि घरेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचा उपयोग करीत पर्यटनाला चालना देण्यासोबतच वैशिष्ट्यपूर्ण घरांमध्ये पर्यटकांना मुक्कामी राहण्याची संधी देऊन रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जाणार आहे.
जिल्ह्यात प्रदूषण करणाऱ्या उद्योगधंद्यांऐवजी रोजगार वाढीसाठी गोंडी चित्रकला, हस्तशिल्प एम्ब्रॉयडरी वर्क, लाखेच्या बांगड्या तयार करणे, पौष्टिक बिस्किटे, पापड तयार करण्यासोबतच वनौषधी तयार करणे तसेच बीजा लाकडाचे ग्लास तयार करणे इत्यादी व्यवसाय सुरु झाले तर त्यातून रोजगारवाढीला मोठा वाव आहे. याचबरोबर जिल्ह्यातील जंगले, वनौषधी, निसर्ग संपदा, पारंपरिक ग्रामीण जीवन इत्यादीचा विचार केला तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये ग्रामीण पर्यटनाला खूप वाव आहे.
पर्यटकांना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने वैशिष्ट्यपूर्ण घरांची छायाचित्रे स्पर्धा आयोजित केली आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून जे लोक इच्छुक असतील त्यांना सोबत घेऊन ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना त्यांच्या घरी पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था कशी करावी याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
हस्तशिल्प चित्रकला, बिस्कीट तयार करणे, पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था कशी करावी इत्यादी विषयांचे प्रशिक्षण घेण्यास ज्या गावातील व्यक्तींची इच्छा असेल त्यांनी १ मार्चपूर्वी आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे नावे द्यायची आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला १५ मार्चपूर्वी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच आपल्या गावातील इच्छुक व्यक्तींची यादी व आपल्या गावातील सुबक घरांचे मोबाईल छायाचित्र व्हॉट्सअप द्वारे ९०७५२४२३०७ या क्रमांकावर किंवा जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेलवर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या ग्रामीण छायाचित्र स्पर्धेसाठी १ मार्चपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात. योग्य छायाचित्रांना गोंदिया फेस्टीवलमध्ये बक्षिस देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी कळविले आहे. (जिलहा प्रतिनिधी)

Web Title: Opportunity for Employment from Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.