मेगा सर्किट जागेअभावी वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:31 AM2018-02-01T00:31:45+5:302018-02-01T00:33:33+5:30

विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती व सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल परिसरात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याच दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुरदोली येथे पर्यटकांसाठी ‘मेगा सर्किट’ उभारण्याचा निर्णय घेतला.

In order to avoid the mega circuit wandering | मेगा सर्किट जागेअभावी वांध्यात

मेगा सर्किट जागेअभावी वांध्यात

Next
ठळक मुद्देपर्यटकांचा हिरमोड : तीन वर्षांपासून प्रस्ताव धूळखात

दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती व सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल परिसरात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याच दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुरदोली येथे पर्यटकांसाठी ‘मेगा सर्किट’ उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी ७ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी सुध्दा मंजूर करण्यात आला. मात्र मेगा सर्किटसाठी जागा उपलब्ध नसल्याने हा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून रखडला आहे.
गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, हाजराफॉल, कचारगड यासारखी प्रसिध्द पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे देशभरातील पर्यटक येथे येतात. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होवून शासनाला महसूल आणि स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. त्यादृष्टीने मुरदोली येथे मेगा सर्किट तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला. मुरदोली येथील शासकीय जमीन गट क्र.२३७ आराजी १.९४ हे. आर. पैकी १.०० हेक्टर आर. जमीन पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने भाडेतत्वावर मागीतली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात पाहणी केली. तत्कालीन तहसीलदार डी.ए.सपाटे यांनी मुरदोली येथील गट नं. २३७ ही जमीन देण्याची तयारी दर्शविली होती. यातील गट क्र. २३७ च्या एक हेक्टर जागेवर ‘पर्यटन मेगा सर्किट’ चे बांधकाम करण्यात येणार होते. मात्र प्रस्तावित जागा गट क्र. २३७ ची नसून गट क्र. १५७ ची आहे. स्थानिक प्रशासनाच्या चुकीच्या माहितीमुळे गट क्र. २३७ च्या जागेऐवजी गट क्र. १५७ ची जागा महामंडळाला दाखविण्यात आली होती. विशेष म्हणजे गट क्र. १५७ ची जागा तलावाची असून ती ओलीताखाली येते. प्रस्तावित जमिनीचा ७/१२ अभिलेखानुसार तलाव पाण्याखाली म्हणून नोंद आहे.ओलीत व पाण्यावरील अधिकाराचे नोंदीनुसार सदर तलावापासून एकूण ७ गटाना ओलीताचा हक्क आहे. या गटातील जागेवर जाण्यासाठी वन विभागाच्या जागेवरुन जावे लागणार आहे. त्यामुळे वनविभागाला येथून रहदारी करण्यासाठी जागा देता येत का हा प्रश्न अनुत्तरित आहे. मागणी केलेल्या प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता विचारात घेवून शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्याची तरतूद आहे. मात्र प्रस्तावित जागा तलावाचा भाग असल्यामुळे जागा देण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मुरदोलीत साकारणारे ७ कोटी ३२ लाख रुपयांचे मेगा सर्किट जागेअभावी वांद्यात येण्याची शक्यता आहे.
काय आहे मेगा सर्किट?
बाहेरुन येणाºया पर्यटकांना राहण्याची चांगली सुविधा मिळाल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होवू शकते. मेगा सर्कीटच्या माध्यतातून यासर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याची एमटीडीसी संकल्पना होती. यातंर्गत सभागृहाचे बांधकाम, पर्यटन स्वागत कक्ष, पर्यटन निवास, बैठक व्यवस्था, अंतर्गत परिसर विकास, बगिच्या, वाहनतळ, पादचारी मार्ग, पाण्याची टाकी, उपहारगृह, कर्मचारी निवास व इतर सुविधा आवारभिंत, विद्युतीकरण, योग कुटी, मचान, लोक निवास, बायोडॉयजस्टर इत्यादी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. मात्र जागेअभावी सध्या हे स्वप्नच ठरत आहे.
मुरदोलीला नैसर्गिक देण
गोंदिया-कोहमारा राज्य मार्गावर मुरदोली हे गाव आहे. गोरेगाववरुन १५ किलोमिटरवर वसलेल्या मुरदोलीला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. येथे चुलबंद जलाशय आहे. रस्त्यालगतच एका भव्य दगडाला चिरत त्यातून निघालेले झाड लक्षवेधी ठरते. राज्य महामार्गावर पर्यटन प्रकल्प झाल्यास या रस्त्यावरुन ये-जा करणारे या प्रकल्पाला भेटी देतील व त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. शासनाला सुध्दा या माध्यमातून महसूल प्राप्त होवू शकते.

Web Title: In order to avoid the mega circuit wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.