बालमृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 5, 2017 12:56 AM2017-06-05T00:56:05+5:302017-06-05T00:56:05+5:30
मागील दीड महिन्यात ३४ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याप्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरूवारी (दि.१) येथील बाई गंगाबाई रूग्णालयाची पाहणी करून ...
डॉक्टरांची केली कानउघडणी : बीजीडब्ल्यू रुग्णालयाची पटेलांनी केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दीड महिन्यात ३४ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याप्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरूवारी (दि.१) येथील बाई गंगाबाई रूग्णालयाची पाहणी करून डॉक्टरांची चांगलीच कान उघडणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बालमृत्यू प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले.
रूग्णालयात ३४ बाळांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. असे असतानाही शासन अजून जागे झाले नाही व आरोग्य मंत्री तसेच आरोग्य संचालकांनी रूग्णालयाला अद्याप भेट दिली नसल्याचे समजताच खासदार पटेल यांनी धरणे आंदोलनानंतर रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी डॉक्टरांची चांगलीच कान उघडणी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना रूग्णालयातील बालमृत्यू प्रकरणाच्या चौकशी व दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
एवढेच नव्हे तर खासदार पटेल यांनी यावेळी रूग्णालयात जावून रूग्णांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रूग्णांना शासनस्तरावर मिळणाऱ्या सर्व सोयी देण्यात याव्या असे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, अशोक गुप्ता, सतीश देशमुख, नानू मुदलीयार, विनीत सहारे, विजय रगडे, करण गिल, टप्पू गुप्ता, तिर्थराज हरिणखेडे, विनायक शर्मा व अन्य पदाधिकारी होते.