लॉकडाऊन काळात पोषण आहार वाटप करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहारासाठी घराबाहेर पडण्यास बाध्य करणारा शासन आदेश धडकल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत घराबाहेर न पडण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून आता त्यांनी काढलेल्या आदेशामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोषण आहार घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोेखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाचा शाळा संचारबंदी असेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळात शालेय विद्यार्थी व लहान बालके शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, याकरीता शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रं. शापोआ/२०२०/प्रक्र-८२/एस.डी.दि.२७ मार्च २०२० अन्वये ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशान्वये शाळेतील शिल्लक पोषण आहाराचा साठा मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत वाटप करावयाचा आहे.यासाठी प्रत्येक शाळास्तरावरुन प्रसिध्दी करुन विद्यार्थी व पालकांना रांगेत उभे करुन वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक धान्यसाठाचे वाटप कसे करावे याबाबतही संभ्रम आहे. शाळांमध्ये तांदूळ वगळता उर्वरीत डाळी, कडधान्याचा फार अन्नसाठा उपलब्ध असतो. सदर पोषण आहार विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत शिक्षक वर्गात संभ्रमाची स्थिती आहे. लहान बालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असताना विद्यार्थी,पालकांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त करणारा निर्णय पूर्णत: विरोधाभासी असल्याची चर्चा जनसामान्यत: आहे. शाळास्तरावर धान्य, डाळी, कडधान्य वाटपाची पुर्वसूचना पोलीस प्रशासनास देण्याचे शासनाचा आदेशात नमूद केले आहे. परंतु संचारबंदी काळात पोलीस प्रशासन व्यस्त असताना त्यांच्यावर धान्य वाटपाप्रसंगी गर्दी टाळण्यासाठी उपस्थित राहण्याचा हा नवीन पिल्लू म्हणजे पोलीस प्रशासनास अशक्यच आहे.
संसर्ग होण्याच्या धोका
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा संसर्ग होण्याच्या काळात एका विशिष्ट व्यक्तीद्वारे प्रतिबंधक साधने (मास्क, सॅनीटायझर) उपलब्ध नसताना अनेक विद्यार्थी, पालकांच्या संपर्कात येऊन धान्य वाटप केल्याने संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता आहे. याबाबतीत शासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन शाळांमध्ये लॉकडाऊनच्या काळात शालेय पोषण आहार वाटपाचा विरोधाभासी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी चालक वर्गातून केली जात आहे.
तर संचारबंदीचे होणार उल्लघंन
राज्यात सुमारे ७५ हजार प्राथमिक शाळेत अंदाजे ५ लाखाहून अधिक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थी यांच्या पालकांसमवेत शालेय पोषण आहार घेण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये उपस्थित झाल्यास संचारबंदी नियम वाऱ्यावर टाकला जाईल व कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक बळावेल, एवढेच नव्हे तर कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हरताळ फासला जाईल अनेक विद्यार्थी व पालकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.