जलाशयातून पाणी सोडण्याचे आदेश निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 09:49 PM2019-05-21T21:49:30+5:302019-05-21T21:49:46+5:30
जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.
उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी टंचाइर् निवारणार्थ उपाय योजना करण्यात प्रशासनाला यावर्षी पूर्णपणे अपयश आले. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला.परिणामी मार्च महिन्यात तलाव, विहिरी बोड्या आणि बोअरवेलनी तळ गाठण्यास सुरूवात केली. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा सध्या स्थितीत केवळ १२ टक्केच पाणी साठा आहे. याचा भूजल पातळीवर परिणाम झाल्याने शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत मे महिन्यापर्यंत वेळ मारुन नेली. परिणामी जिल्हावासीयांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करण्याची पाळी आली आहे. जि.प.च्या १८ मे रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत गंगाधर परशुरामकर यांनी जलाशयात काही प्रमाणात पाणी साठा शिल्लक असून तो सोडल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. याला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुध्दा एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी २१ मे रोजी जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार चुलबंद जलाशयाचे पाणी म्हसवाणी, घोटी, बोथली, डव्वा, घाटबोरी-तेली १ दसलक्ष घनमीटर तर सिरपूर जलाशयाचे पाणी मकरधोकडा, शिलापूर, पद्मपूर, फुक्कीमेटा, धारणी या गावांसाठी २ दसलक्ष घनमीटर, ओवारा मध्यप्रकल्पाचे पाणी रामाटोला, माळीटोला, वळद, कंटगटोला, कवडी, पानगाव, येरमडा या गावांसाठी १ दसलक्ष घनमीटर आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कासा, बिरसोला, काटी या गावांकरिता ०.७५ दसलक्ष घन मिटर पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. या मुळे या परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलाशयातून पाणी सोडण्यात यावे यासाठी परशुरामकर यांनी मागील तीन दिवसांपासून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.