४८१ बियाण्यांच्या बॅग विक्री बंदचा आदेश
By admin | Published: June 27, 2017 01:00 AM2017-06-27T01:00:49+5:302017-06-27T01:00:49+5:30
खरीप हंगामात शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी सुरू असलेल्या कृषी केंद्रांच्या तपासणी मोहिमेत दोन दिवसात १९ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी सुरू असलेल्या कृषी केंद्रांच्या तपासणी मोहिमेत दोन दिवसात १९ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात ४८१ बियाण्यांच्या बॅग विक्रीबंदचा आदेश देण्यात आला.
कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय दक्षता पथकाने ही कारवाई केली. त्यात गोंदिया, मोरगाव अर्जुनी, सालेकसा, आमगाव, तिरोडा, देवरी या तालुक्यातील १९ कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात न्युजीविडू, पायस सीड्स, चैतन्य सीड्स, कृषीधन, महागुजरात, रायझिंग, यशोदा, सिपना सीड्स या कंपन्यांच्या बियाण्यांची तपासणी केली.
बियाण्यांचे उगमस्त्रोत, साठा पुस्तक, बिल बुक, बिलावर शेतकऱ्यांची सही नसणे, दरपत्रक न लावणे, प्रिन्सीपल सर्टीफिकेट नसणे, विक्री परवान्यात समाविष्ठ नसणे व इतर बाबी अनियमित असल्याचे आढळल्याने बियाणे विक्रीबंदचा आदेश देण्यात आला.
संबंधित कृषी केंद्र संचालकांना दि.२८ व ३० ला रेकॉर्ड घेऊन बोलविण्यात आले. या वेळेत ते आले नाही तर विक्री परवान्याच्या निलंबनाचा आदेश देऊन बियाण्यांचा साठा जप्त केला जाणार आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, मोहीम अधिकारी शुक्ला, गुणनियंत्रण अधिकारी मोहाडीकर आदींनी केली.
सध्या खरीप हंगामासाठी जिल्हाभरात महाबीजचे १७ हजार क्विंटल तर खासगी कंपन्यांचे २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यापैकी ८० टक्के बियाण्यांचे विक्री झाली आहे. या बंदीनंतर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.