आदेश आले, पण खरेदी होणार दिवाळीनंतरच; १४३ केंद्रांना मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:54 AM2023-11-10T11:54:54+5:302023-11-10T11:56:50+5:30

जाचक निकष काढले :नोंदणी करण्यास सुरुवात

orders to start buying paddy stuck, But the purchase will be after Diwali only; 143 centers got approval | आदेश आले, पण खरेदी होणार दिवाळीनंतरच; १४३ केंद्रांना मिळाली मंजुरी

आदेश आले, पण खरेदी होणार दिवाळीनंतरच; १४३ केंद्रांना मिळाली मंजुरी

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी करण्याचे शासनाचे आदेश अखेर गुरुवारी (दि.९) धडकले. पण हे आदेश उशिरा निघाल्याने आणि शेतकऱ्यांची नोंदणी झाली नसल्याने दिवाळीपूर्वी धान खरेदीला सुरुवात हाेण्याची शक्यता फार कमी आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. पण यंदा शासनाने धान खरेदी करणाऱ्या संस्थाना नवीन निकष लागू केले होते. हे निकष जाचक असल्याचे सांगत संस्थानी निकष रद्द केल्याशिवाय धान खरेदीला सुरुवात करणार नाही अशी भूमिका घेतला.

हा वाद जवळपास महिनाभर चालला. अखेर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर मुंबई येथील बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. त्यात बैठकीत जुन्याचा निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शासनाने या संदर्भातील जीआरसुद्धा काढला. पण धान खरेदीला सुरुवात करण्याचे आदेश काढले नव्हते. त्यामुळे मागील आठ दहा दिवसांपासून धान खरेदीला सुरुवात झाली नव्हती. दिवाळीचा सण असल्याने शेतकरी खरिपातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी करून ते विक्रीसाठी बाजारपेठेत आणत होते. पण धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली होती. त्यानंतर गुरुवारी शासनाने धान खरेदी सुरू करण्याचे आदेश काढले आहे.

दिवाळीनंतरच सुरू होणार खरेदी

धान खरेदी सुरू करण्याचे आदेश उशिरा निघाल्याने जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होऊ शकले नाही. त्यातच धान खरेदी केंद्रावर बारदाना व आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर धान खरेदी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नोंदणी झाल्यावरच खरेदी

शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या एनएमईल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्याच शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे. आतापर्यंत केवळ २,१३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात नोंदणी शिल्लक असल्याने धान खरेदीला थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.

मका खरेदी केली जाणार

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील बरेच शेतकरी मागील तीन चार वर्षांपासून मक्याची लागवड करतात. त्यामुळे त्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू याकरिता या भागात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत मका खरेदी केली जाणार आहे.

असे आहेत धान व मक्याचा हमीभाव

  • धान २,१८३ रुपये प्रति क्विंटल
  • मका २,०२० रुपये प्रति क्विंटल
  • ज्वारी २,५०० रुपये प्रति क्विंटल

 

Web Title: orders to start buying paddy stuck, But the purchase will be after Diwali only; 143 centers got approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.