निर्माल्यापासून तयार करणार सेंद्रीय खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:27 PM2017-10-03T21:27:52+5:302017-10-03T21:28:13+5:30
गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले. मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी स्वयंस्फुर्तीने निर्माल्य सामाजिक वनीकरण विभागाच्या स्वाधिन केले. त्यामुळे या विभागाच्या कार्याला देखील हातभार लावण्यास मदत झाली.
राज्यभरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. गोंदिया येथे मागील सहा वर्षांपासून दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पूजेचे साहित्य, फुले, निंबू आदी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता ते जमिनीत पुरून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरणपूरक जागरूकता दाखवून गोंदिया येथे निर्माल्य रथाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निर्माल्य रथात फूलहार, निंबू, नारळ बूच आदि साहित्य निर्माण रथात अर्पण करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीनगर, कन्हारटोली, पूनाटोली, रेलटोली, इंगळे चौक, गोविंदपूर, गांधी प्रतिमा, मनोहर चौक, चांदणी चौक, मामा चौक, शंकर चौक, वाजपेयी वार्ड, सावराटोली, हेमू कॉलनी चौक, श्री टॉकिज, कुंभारटोली, बजाज वार्ड व इतर दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देवून निर्माल्य जमा करण्यात आले. निर्माल्य रथ दुर्गा उत्सव मंडळासमोर पोहोचताच मंडळातील उत्साही सदस्य त्वरित एकत्र आले.
स्वत:हून वाहनापर्यंत निर्माल्य आणून देत सामाजिक वनीकरण विभागाच्या मोहिमेला सहकार्य केले. यावरून शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापासून पर्यावरणपूरक मंडप सजावट करणाºया मंडळाचा सत्कार करण्यात येतो.
यावर्षी श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव समिती मामा चौक गोंदिया (नानू मुदलियार) व सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ कुंभारटोली मालवीय वार्ड (खोब्रागडे) यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक देण्यात आला. विशेष म्हणजे निर्माल्यापासून तयार होणारे सेंद्रीय खताचे गरजू शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे.
निर्माल्य दानातून टाळली पर्यावरणाची हानी
पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पूजेचे साहित्य, फूल मूर्तीसोबत पाण्यात विसर्जित केल्यास तेथील पाणी प्रदूषित होते. पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वनविभागाच्या वतीने निर्माल्य रथ फिरविण्यात आला. निर्माल्य रथ शहरात विविध ठिकाणी फिरवून निर्माल्य गोळा करण्यात आले. या कार्यात नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे, स्वामी विवेकानंद हायस्कूल कारंजा येथील हरित सेना प्रभारी शिक्षक कृष्णकांत बिसेन आदींनी पुढाकार घेतला व मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य रथ अखंड सुरू ठेवले.
२९ मंडळांचा पुढाकार
गोंदियातील २९ मंडळांकडून निर्माल्य जमा करण्यात आले. यात एक गाडी निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या बंगल्यासमोरील रोपवन क्षेत्रात खड्डा खोदून त्यात टाकण्यात आले. त्यात दुसºया पॉलिथिनही ठेवण्यात आल्या. या खड्ड्यातील निर्माल्याचे कंपोष्ट होवून पुढील हंगामात ते खत रोपे निर्माण करण्याच्या कार्यात उपयोगी येणार आहे, असे सामाजिक वनीकरण अधिकारी युवराज कुंभलकर यांनी सांगितले.