भुयारी गटार योजनेसाठी विशेष सभेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:56 PM2018-08-23T20:56:38+5:302018-08-23T20:57:28+5:30
नगर परिषद सदस्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नगराध्यक्षांनी भुयारी गटार योजनेच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.२७) विशेष सभेचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद सदस्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नगराध्यक्षांनी भुयारी गटार योजनेच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.२७) विशेष सभेचे आयोजन केले आहे. चार विषयांबाबत ही विशेष सभा बोलाविण्यात आली असून यात भुयारी गटार योजनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
१८ जुलै रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. मात्र मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या पारिवारीक कारणामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती. या सभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी भुयारी गटार योजनेचा विषय सूचीत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, तहकूब झालेली १८ तारखेची सभा २५ जुलै रोजी घेण्यात आली होती.
मात्र त्यातही विरोधी पक्षातील नगरसेवकांनी भुयारी गटार योजनेचा विषय सभागृहात मांडला जावा अशी मागणी करून चांगलाच गोंधळ घातला होता. या सभेत कामकाज आटोपले होते. मात्र नगरसेवकांच्या मागणीवरून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी विशेष सभा बोलावून भुयारी गटार योजनेचा विषय मांडणार असे आश्वासन दिले होते.
दिलेल्या आश्वासनानुसार, नगराध्यक्ष इंगळे यांनी सोमवारी (दि.२७) विशेष सभा बोलाविली आहे. चार विषयांना घेऊन ही विशेष बोलाविण्यात आली आहे. यात भुयारी गटार योजनेसह कत्तलखान्यासाठी आरक्षीत जागा, सेवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी आरक्षीत करणे, कृष्णपुरा बगिचा मधील जागा पंपींग स्टेशनसाठी उपलब्ध करणे व स्मशान भूमीकरिता आरक्षीत जागेपैकी दोन एकर जागा सेवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी आरक्षीत करून उपलब्ध करून देणे या विषयांचा समावेश आहे.
मात्र भुयारी गटार योजनेला घेऊन नगरसेवकांनी २५ जुलै रोजीच्या सभेत चांगलाच गोंधळ घातला होता. त्यामुळे आता नेमका हाच विषय सभागृहात येणार असल्याने सर्वांच्या नजरा या विषयाकडे लागल्या आहेत. या विषयावर सभेत काय होते हे बघायचे आहे.