त्या अनाथ बहिणी करणार आता शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:17+5:302021-06-24T04:20:17+5:30
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सूर्यवंशी परिवारातील चार बहिणीवरील आई-वडिलांचे छत्र चार वर्षांपूर्वी हिरावल्या गेले. यामुळे त्या चारही ...
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सूर्यवंशी परिवारातील चार बहिणीवरील आई-वडिलांचे छत्र चार वर्षांपूर्वी हिरावल्या गेले. यामुळे त्या चारही बहिणीवर मोठा आघात घडला. ‘लोकमत’च्या पुढाकाराने अनेक दानदात्यांकडून आधार मिळाला. त्या बहिणीच्या वाट्याला येणारी अर्धा एकर शेतजमीन करण्याचा त्यांनी मानस केला. हाती पैसा नाही, अखेर सामाजिक दायित्व ओळखणारा एक कृषी केंद्र संचालन पुढे आला. सर्व सोपस्कार करून त्या अनाथ मुलींच्या शेतामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या साक्षीने धानाचे पऱ्हे टाकण्यात आले.
निमगाव येथील सूर्यवंशी परिवारातील मोहीनी, स्वाती, जोत्सना, ट्विंकल या चार बहिणी जन्मदाते मायबापाचे छत्र हिरावून एप्रिल २०१७ मध्ये अनाथ झाले. लोकमतचे प्रतिनिधी अमरचंद ठवरे यांनी लोकमतच्या माध्यमातून त्यांची सातत्यानी व्यथा मांडली. ठिकठिकाणचे दानदाते पुढे आले. गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. सविता बेदरकर, समाजशील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे आजतागायत त्या चार बहिणींना अन्नधान्यासह सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवठा करीत आहेत. आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने काका बबन सूर्यवंशी सांभाळ करीत होता. परंतु अचानक १७ जुलै २०२० रोजी काकाचेसुध्दा निधन झाले. तेव्हापासून त्या चार अनाथ बहिणींनी आपला वेगळा संसार थाटला.
.......
खेळण्याबाळगण्याच्या वयात कुटुंबाची जबाबदारी
खेळण्याबाळगण्याच्या वयात त्या चारही बहिणीवर संसाराची जबाबदारी आणि सर्वात मोठी मोहिनी (२०), स्वाती (१८), जोत्स्ना (१४), ट्विंकल (१२) चार बहिणीचा भार सज्ञान स्थितीत असलेल्या मोहिनी, स्वाती यांनी उचलला. खरीप हंगामासाठी वडिलाच्या वाट्याला येणारी अर्धा एकर शेतजमीन स्वत: करण्याची हिम्मत मोहिनी या मोठ्या मुलीने केली. बियाणे मिळवून द्या अशी व्यथा अमरचंद ठवरे यांना केली. अमरचंद ठवरे यांनी चान्ना येथील लोगडे कृषी केंद्राचे संचालक महेश लोगडे यांना त्या चार बहिणी व्यथा मांडून बियाणे उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी सुध्दा बियाणे उपलब्ध करून दिले.
...........
मदतीचे हात आले पुढे
बोंडगावदेवीचे युवा सामाजिक कार्यकर्ते आनंद बोरकर यांनी ट्रॅक्टरने नांगरणी करून देऊन पऱ्हे टाकण्यासाठी मदत केली. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांना खताची व्यवस्था करून दिली. तालुका कृषी अधिकारी लांजेवार यांच्या मार्गदर्शनात त्या अनाथ बहिणींच्या शेतामध्ये मंगळवारी धानाचे पऱ्हे टाकण्यात आले. मदतीसाठी अनेकजण पुढे आल्याने चारही बहिणींना आधार मिळाला.