प्रेमीयुगलांची आधारशिला आबांमुळे झाली पोरकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:16+5:302021-04-19T04:26:16+5:30
गोंदिया : तंटामुक्त समित्यांमुळे जातीय सलोखा व सामाजिक एकता निर्माण झाली. आंतरजातीय विवाह किंवा प्रेमविवाह करणाऱ्यांची आधारशिला असलेली तंटामुक्त ...
गोंदिया : तंटामुक्त समित्यांमुळे जातीय सलोखा व सामाजिक एकता निर्माण झाली. आंतरजातीय विवाह किंवा प्रेमविवाह करणाऱ्यांची आधारशिला असलेली तंटामुक्त मोहीम आबांमुळे पोरकी झाली आहे. आबा गेल्यापासून या मोहिमेकडे ना भाजप सरकारने लक्ष दिले ना आता राष्ट्रवादीच्या सहकार्याने तयार झालेल्या महाआघाडी सरकारनेही दुर्लक्ष केले आहे.
तंटामुक्त मोहीम राज्यात सुरू होण्यापूर्वी प्रेमवीरांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. घरातून नकार मिळाल्याने प्रेमीयुगुलांचा प्रेमभंग होऊन अनेकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अनेक प्रेमीयुगुलांनी आई-वडिलांचा विरोध झुगारून पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे समाजात वैर निर्माण झाले होते. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांचे पालक पोलिसांकडे तक्रार दाखल करत होते. अनेक युगुलांनी समाजाचा विरोध झुगारून मंदिरात विवाह केल्याचेही अनेक उदारहणे आहेत. मंदिरात लग्न करताना वयाच्या पुराव्यासाठी दाखला सादर करावा लागत होता. मात्र, त्यांच्याजवळ दाखला राहत नसल्याने त्यांचा विवाह नाकारण्यात येत होता. कोर्ट मॅरेज करताना प्रेमीवरांना वयाचा पुरावा, वधू-वरांकडील दोन साक्षीदार, साक्षीदारांचे ओळखपत्र, वकील यादी बाबी सादर करावे लागत होते. मात्र, आता तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत गावागावांत तंटामुक्त समित्या स्थापन झाल्याने तंटामुक्त समित्यांच्या अध्यक्षांकडे अर्ज सादर करून अनेक प्रेमीयुगुल तंटामुक्त गावसमितीच्यामार्फत विवाह केला. एकट्या गोंदिया जिल्ह्यात तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह व प्रेमविवाह घडून आले. त्यामुळे प्रेमवीरांना मोठाच दिलासा मिळला. तंटामुक्त मोहिमेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या युगुलांना शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे ५० हजार रुपये मदत दिली जाते. ती रक्कम मिळवून देण्यासाठी मात्र कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे अनेक जोडपी अनुदानापासून वंचित आहेत.