अनाथ मुलांना दिली मायेची ऊब ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:17+5:302021-06-22T04:20:17+5:30
बोंडगावदेवी : एखादी व्यक्ती मोठ्या पदावर असली, तर तिचा प्रशासकीय तसेच सामाजिक जीवनात एक दरारा असतो. त्यातील काहीजण सामाजिक ...
बोंडगावदेवी : एखादी व्यक्ती मोठ्या पदावर असली, तर तिचा प्रशासकीय तसेच सामाजिक जीवनात एक दरारा असतो. त्यातील काहीजण सामाजिक दायित्व अंगिकारून समाजजीवनात सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करून सहृदयतेची भावना ठेवणारे मोजकेच असतात. प्रशासकीय कारभारात वचक ठेवून सामाजिक दायित्व पार पाडण्यात. सदोदित अग्रक्रमावर राहणाऱ्या अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी फादर्स डे चे औचित्य साधून जिल्ह्यातील अनाथ मुलांसोबत सहभागी होऊन त्यांना मायेची ऊब दिली.
जन्मदात्या माय-बापाचे छत्र हिरावलेल्या निरागस मुला-मुलींना अन्नधान्यासह इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका प्रा. डॉ. सविता बेदरक, समाजशील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील दानदात्यांच्या सहयोगाने नियमित केला जातो. रविवारी (दि. २०) फादर्स डे दिवसाचे औचित्य साधून सौंदड येथील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुलांचा मनोमीलनासह सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार उषा चौधरी, समाजसेविका सविता बेदरकर, जगदिश लोहिया, दामोधर नेवारे, मधुसूदन दोनोडे, बी. टी. यावलकर, सुखलाल मेश्राम, राजू वैश्य, अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनाथ मुलांना सढळ हाताने मदत करून सामाजिक दायित्व जपणाऱ्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी ठिकठिकाणाहून आलेल्या अनाथ मुलांशी हितगुज साधली. आस्थेने त्या निरागस मुलांची आपबीती ऐकली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वत:ला अनाथ, बिचारे समजू नका, तुमच्यासोबत आम्ही आहोत. संकटाला घाबरू नका, जो संकटाशी लढतो, तोच पुढे यशस्वी होतो. माणसाचे जीवन घडविण्याचे काम फक्त शिक्षणच करते, अर्ध्यावर शिक्षण सोडू नका. उच्च ध्येय बाळगा. वेळोवेळी मदतीचे हात तुमच्यासाठी पुढे येतील, असे सांगून स्वत:ची आपबीती कथन करून अनाथांना, अनाथ बालकांना धीर दिला. यावेळी त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी अनाथांना दत्तक घेण्याची याप्रसंगी ग्वाही दिली.
संचालन सविता बेदरकर यांनी केले. प्रास्ताविक अनिल मेश्राम यांनी केले, तर आभार अमरचंद ठवरे यांनी मानले.