आमची लढाई बहुजनांच्या हक्कासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:46 AM2018-03-08T00:46:58+5:302018-03-08T00:46:58+5:30
मी शेतकरी व बहुजनांच्या लढ्यासाठी राजीनामा दिला. मात्र त्याचा अपप्रचार केला जातो. गावाच्या व्यवस्थेत एकमेकांशी न भांडता संघटित रुपाने लढा देण्याची सद्यस्थितीत गरज आहे.
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : मी शेतकरी व बहुजनांच्या लढ्यासाठी राजीनामा दिला. मात्र त्याचा अपप्रचार केला जातो. गावाच्या व्यवस्थेत एकमेकांशी न भांडता संघटित रुपाने लढा देण्याची सद्यस्थितीत गरज आहे. महाभारतात अंगठा मागितला गेला. आता बहुजनांचा जीव मागितला जातो. आमची लढाई खुर्चीसाठी नव्हे तर बहुजनांच्या हक्कासाठी आहे, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी केले.
एकलव्य समता ढिवर समाज सुधारक संघटना झरपडाच्या वतीने (दि.५) वीर धनुर्धर एकलव्य यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रीकापुरे होते. अतिथी म्हणून अजाबराव शास्त्री, केशव शहारे, सदाशिव वलथरे, भागवत नाकाडे, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, मंदा कुंभरे, रत्नदीप दहीवले, आनंदकुमार जांभुळकर, चंद्रशेखर ठवरे, सरपंच कुंदा डोंगरवार, उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे, राजू पालीवाल, सोमेश्वर सौंदरकर, इंद्रदास झिलपे, विनायक मस्के, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, कांता पाऊलझगडे, तनुरेषा रामटेके, देवराज भोयर, होमराज ठाकरे, अशोक मस्के, आनंदराव मस्के, नरेश नेवारे, अरविंद साखरे, भैय्यालाल मेश्राम, नारद शहारे, केशव शहारे, रविकांत मस्के, पोलीस पाटील संतोष डोंगरवार, उषा पगाडे, अस्मिता मोटघरे, माला लोणारे, माधुरी नेवारे, सुषमा मडावी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, आजच्या व्यवस्थेत महिला शेतकरीसुद्धा आत्महत्या करीत आहेत. महागाई व बेरोजगारी वाढत आहे. मत्स्यमार समाज आजही दुर्लक्षित आहे. रेणके आयोग लागू करा, अशी मागणी आपण पंतप्रधानाकडे केली होती मागणी केली. ती पूर्ण होऊ शकली नाही. या समाजाला काहीच मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे. सरकारची व्यवस्था शेतकरी व बहुजनांविरुध्द आहे. एकलव्य प्रामाणिक होता, त्याने अंगठा दिला. आता अन्यायाच्या व्यवस्थेविरुध्द एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. आमची बहुजनांच्या हक्काची लढाई असून ती जिंकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मागणारे नाही तर देणारे आहोत.
निर्जीव पुतळ्यांपासून सजिवांनी प्रेरणा घ्यावी
चंद्रिकापुरे म्हणाले, जो माणूस इतिहास विसरतो त्याची प्रगती होत नाही. इतिहास संधी देतो, त्याचा आपण अभ्यास करीत नाही. त्यामुळे प्रगती खुंटते. महापुरुषांचे चरित्र जाणून घ्या. त्यांच्यापासून युवा पिढीने प्रेरणा घेण्याची गरज आहे. संविधानाचे वाचन करा. अधिकाराचा वापर कसा करायचा, हे जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत सत्ता प्राप्त होणार नाही. महापुरूषांच्या निर्जिव पुतळ्यापासून सजिवांनी प्रेरणा घ्यावी, यातच आपले हित असल्याचे सांगितले.
पूर्वीचाच काळ येणार काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने लोकशाही हातात दिली. या लोकशाही व्यवस्थेने जग जिंकता येते. संविधनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. मात्र ग्रामीण विभागातील शिक्षण व्यवस्थाच बंद होण्याच्या मार्गावर आहे. संविधनामुळे आपण टिकत होतो, मात्र पूर्वीचाच काळ येतो की काय? अशी भयावह स्थिती निर्माण होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे धनदांडग्याचीच मुले शिकतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. ही व्यवस्था हाणून पाडणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी बहुजनांचे व रयतेचे राज्य निर्माण केले. आता रयतेचे राजेच लोक लुटायला निघाली आहेत, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
गुरू नसताना गुरूदक्षिणा मागितली
प्रबोधनकार अजाब शात्री म्हणाले, महिला व शुद्रांना शिक्षण द्यायचे नाही, अशी प्रणाली जुन्या काळात होती. एकलव्य जेव्हा आश्रमात शिक्षण घेण्यासाठी गेला तेव्हा द्रोणाचार्याने तुम्हाला शिक्षण घेता येत नाही, असे ठणकावून सांगितले. एकलव्याने द्रोणाचार्याचा पुतळा बनवून, पुतळ्याला गुरू मानून स्वत:च धनुर्विद्या शिकून घेतली. मात्र जिवंत द्रोणाचार्य त्याचा गुरू नसतानाही गुरूदक्षिणेत एकलव्यास अंगठा मागितला. मात्र डॉ. आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिले. त्यात सर्वांसाठी शिक्षणाचे दालने उघडली गेली. आता आम्हाला कुणीही अंगठा मागू शकत नाही. तरीही वर्तमान सरकार बहुजनांसाठी शिक्षणाचे दार बंद करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.